मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) कधीच शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. मी बोलल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला सुरुवात केली आहे, असा दावा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या या आरोपांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. शिवाजी महाराजाचं नाव घातलं का नाही? नाव घेतलं की नाही हे सर्व बालिश आरोप करणं बंद करा. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी गेला का चैत्यभूमीवर. पाच मिनिटाच्या अंतरावर चैत्यभूमी आहे. कधी तुमच्या हाताने हार घातला का बाबासाहेबांच्या फोटोला? असा सवालच जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांच्या प्रत्येक आरोपाचं खंडन केलं. तसेच इतिहासात डोकावू नका. त्या जाळ्यात अडकून पडाल. बहुजनांची मुलं शिकली आहेत. तुम्ही सांगितलेला इतिहास ते मानणार नाहीत, असंही आव्हाड म्हणाले.
राज ठाकरेंना कधी फुले, शाहू महाराजांचं नाव घ्यावसं वाटत नाही. बाबासाहेबाचं नाव घ्यावसं वाटत नाही. बाबासाहेबांबद्दल थोडसं प्रेम आणि आपुलकी असेल तर तुम्ही संविधानाच्या विरोधात जाणार नाही, असंही ते म्हणाले. महात्मा फुलेंनी समाधी शोधली हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का? शाहू महाराजांनी कोल्हापुरात शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा पुतळा उभारला हे सांगायला तुम्हाला लाज वाटते का? पुतळा उभारताना शाहू महाराजांना विरोध झाला हे सांगायला लाज वाटते का? इतिहासाशी खेळू नका. इतिहासात अडकून जाल. ट्रॅप असतो. पुरंदरे त्यातच अडकले. जेव्हा लोकांनी अभ्यास सुरू केला. तेव्हा पुरंदरेंना बाहेर येता आलं नाही. स्वत:च विणलेल्या जाळ्यात ते अडकले, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
इतिहासाच्या प्रश्नावर कधीच कॉम्प्रमाईज करायचा नसतो. याच्याशी पक्षाचा संबंध नसतो. जेव्हा इतिहासकार गप्प बसतील तेव्हा देशाचं वाटोळं होतं. तुम्ही जोपर्यंत इतिहासाचे आकलन करत नाही. तोपर्यंत तुमचं मन भरकटलेलं असतं, असा चिमटाही त्यांनी काढला.
शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. फुल्यांचा पोवाडा वाचा. महाराजांना गुरुची गरज नव्हती हे त्यांनी सांगितलं. शिवाजी महाराज जन्माला आले होते, त्या घराला मोठी परंपरा होती. मालोजीराजे त्यांनी वारकरी पंथाला वाढवलं. राजाश्रय दिला. अशा घराण्यात जन्मलेल्या माणसाला तलवार कशी चालवावी हे त्यांना शिकवावं लागत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.