मुंबई: राज्यसभा निवडणुकीपूर्वी (rajyasabha election) महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकत्र येत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सर्व आमदार आमच्यासोबत असल्याचा दावाही केला. सर्व काही अलबेल असून आमदार आमच्यासोबतच असल्याचे दावेही केले. इतकेच काय आमचे चारही उमेदवार निवडून येतील असंही तिन्ही पक्षाच्या प्रमुखांकडून सांगण्यात आलं. मात्र, आज मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात भलतंच घडलं आहे. त्यामुळे सर्वाधिक टेन्शन शिवसेनेला (shivsena) आलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी आपला प्लान बदलला. आपले उमेदवार सेफ व्हावेत म्हणून दोन्ही काँग्रेसने ही खेळी केली. त्यामुळे शिवसेनेच्या तंबूत खळबळ उडाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे शिवसेनेचा एक संजय चक्रव्युहात सापडल्याचं चित्रं निर्माण झालं. त्यामुळे हे चक्र शिवसेना कसे भेदते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
महाविकास आघाडीने गेल्या तीन दिवसांपासून जोर बैठका, चर्चा करत निवडणुकीची रणनीती ठरवली होती. काल रात्रीपर्यंत ही रणनीती फिक्स होती. त्यामुळे आघाडीचे नेते निश्चिंत होते. आता सकाळी सर्व काही अलबेल होईल, असं वाटत होतं. पण सकाळी मतदानाला प्रत्यक्षात सुरूवात झाली तेव्हा एक बातमी आली आणि शिवसेना नेत्यांच्या तोंडचं पाणीच पळालं. ती बातमी म्हणजे दोन्ही काँग्रेसने मतांचा कोटा बदलला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मतांचा कोटा 42 वरून 44 वर नेला. त्यामुळे शिवसेनेच्या पायाखालची जमीनच सरकली. शिवसेनेचा एक संजय चक्रव्युवहात अडकणार अशी अवस्था झाली. शिवसेनेकडून राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार उभे आहेत. त्यामुळे या दोघांपैकी कुणाला दगाफटका होतो, अशी धाकधुक निर्माण झाली.
दोन्ही काँग्रेसच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड संतापल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेनेचे इतर नेत थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी पवारांकडे मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. नंतर पवारांचा निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेले.
एव्हाना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान भवनात आले होते. तिकडे तीन तास उलटून गेले तरी शिवसेनेच्या एकाही आमदाराने मतदान केलं नव्हतं. मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर मिलिंद नार्वेकरही या बैठकीत पोहोचले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या नाराजीनंतर राष्ट्रवादीने आपली चूक सुधारली. शिवसेनेच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची 10 मते देण्याचं राष्ट्रवादीने जाहीर केलं. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. त्यानंतर शिवसेनेच्या आमदारांनी मतदान करण्यास सुरुवात केली. पहिल्याच फटक्यात शिवसेनेचे 17 आमदार मतदान करून बाहेर पडले.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील मानापमान नाट्य संपत नाही तोच महाविकास आघाडीच्या अपक्ष आमदारांनी शेवटच्या क्षणी खेळी केली. त्यामुळे शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही डोकेदुखी वाढली. अपक्षांनी पहिल्या पसंतीची मते संजय पवार यांना देणार असल्याचं जाहीर केलं. दुसऱ्या पसंतीची मते संजय राऊत आणि तिसऱ्या पसंतीची मते प्रफुल्ल पटेल देणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आघाडीचा ताप वाढला आहे.
हा सर्व खेळ सुरू असतानाच एक बातमी येऊन धडकली अन् महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या काळजात धस्स झालं. ती बातमी म्हणजे जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर यांची मते बाद करण्याची भाजपने केलेली मागणी. आव्हाड आणि ठाकूर यांनी पोलिंग एजंटच्या हातात मतपत्रिका दिल्याचा आक्षेप भाजपच्या पराग आळवणी यांनी घेतला. तर सुहास कांदे यांनी दोन्ही पक्षांच्या एजंटला दिसेल अशा पद्धतीने मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप भाजपचे आमदार अतुल सावे यांनी घेतला. त्यामुळे आघाडीत खळबळ उडाली. आता तीन मते बाद होतात की काय असंच वाटत होतं. पण रिटर्निंग ऑफिसरने ही मते बाद होत नसल्याचा निर्वाळा दिला आणि आघाडीच्या नेत्यांच्या जिवात जीव आला.