मुंबई (दिनेश दुखंडे) : शिवाजी पार्क मैदानातील दसरा मेळाव्याच्या आयोजनावरुन शिंदे गटाने माघार घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचा दसऱ्याला शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदे गटाने अचानक एकाएकी माघार का घेतली? असा प्रश्न विचारला जातोय. त्यावर दादरमधील शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी माघार का घेतली? त्यामागची भूमिका स्पष्ट केली. “दसरा हा हिंदूचा सण आहे. हिंदुंच्या सणामध्ये वाद नको, असं एकनाथ शिंदे यांचं मत आहे. सण आनंदात साजरे व्हावेत हे शासनाच धोरण आहे. त्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूतदारपणाच एक पाऊल उचलल आहे. आझाद मैदाना, क्रॉस मैदानाची तयारी सुरु केलीय. मला तसे निर्देश मिळालेत” असं सदा सरवणकर म्हणाले. “दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनाप्रमुखांनी 50 वर्ष हिंदुत्वाचे ज्वलंत विचार दिले. तेच विचार दसरा मेळाव्यात ऐकायला मिळावेत हीच आम्हा शिवसैनिकांना अपेक्षा आहे” असं सरवणकर म्हणाले.
ठाकरे गटाला लोकांची सहानुभूती मिळू नये, म्हणून असा निर्णय घेतला का? त्या प्रश्नावर सरवणकर म्हणाले की, “आम्ही कुठल्याही वादाच्या विरुद्ध आहोत. काम करुन संघटना मोठी करावी, जनतेची सेवा करावी ही शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरूनच उत्सव जल्लोषात साजरा व्हावा, कुठे विघ्न नको ही निश्चित भावना आहे”
असा निर्णय का घेतला?
शिवाजी पार्क मैदान मिळवण्यासाठी 1 ऑगस्टला शिवसेना युबीटीचा अर्ज आहे आणि 7 ऑगस्टला शिंदे गटाने पत्र दिलं. त्यावर सदा सरवणकर म्हणाले की “पत्राच्या बाबतीत विचार केला, तर 1 तारखेला मी पहिलं पत्र दिलं. 7 तारखेला दुसरं पत्र अशी दोन पत्र दिली. पण सणात वाद नको, हे शिंदे साहेबांच धोरण आहे. त्या भावनेपोटीच त्यांनी समजूतदारपणा दाखवला. नागरिकांच हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला”