लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन भाजपवर शिंदे गटाचं अचानक आक्रमण का?

| Updated on: Jun 22, 2024 | 1:24 AM

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदेंची शिवसेना भाजपवर अचानक आक्रमक झालेली पाहयला मिळतेय. भाजपनं शेवटच्या क्षणापर्यंत जागा सोडल्या नाहीत. त्यामुळे नुकसान झाल्याचं शिंदेंचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटवलंय.

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन भाजपवर शिंदे गटाचं अचानक आक्रमण का?
Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन शिंदेंची शिवसेना भाजपवर अचानक आक्रमक झालीय. भाजपनं शेवटच्या क्षणापर्यंत जागा सोडल्या नाहीत. भाजपच्या खेळामुळचं नुकसान झालं, असा आरोप शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांनी केलाय. आधी रामदास कदम आणि आता संजय गायकवाड. शिंदेंची शिवसेना लोकसभेच्या निकालावरुन भाजवरच कशा आक्रमक झालीय, हे स्पष्ट दिसतंय. 7 ऐवजी 14 जागा जिंकलो असतो. पण भाजपच्या खेळामुळं शिंदेंच्या शिवसेनेला फटका असा आरोप आमदार संजय गायकवाडांनी केला.

सर्व्हेचं कारण देत, हा येत नाहीत तो येत नाही असा दबाव टाकला आणि शेवटच्या क्षणापर्यंत जागा न सोडल्यानं भाजपच्या नेत्यांनी महायुतीचंही नुकसान केल्याची टीका गायकवाडांनी भाजपवर केलीये. भाजपनं आपले उमेदवार दीड-2 महिन्याआधी दिले आणि आमची जागा शेवटच्या क्षणापर्यंत सोडली नाही, असा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचा आहे.

  • यवतमाळ-वाशिम मध्ये शेवटच्या क्षणी भावना गवळींचा पत्ता कट करुन राजश्री पाटील यांना तिकीट दिलं. त्या पराभूत झाल्या.
  • नाशिकमध्ये हेमंत गोडसेंना एक दिवसाआधी तिकीट दिलं, ते पराभूत झाले.
  • हिंगोली – हेमंत पाटलांची जाहीर उमेदवारी बदलली, त्यांच्या जागी बाबूराव कोहळीकरांना तिकीट दिलं ते पराभूत झाले.
  • रामटेकमध्ये कृपाल तुमानेंचं तिकीट कापून काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवेंना तिकीट दिलं ते पराभूत झाले.
  • ठाण्यात नरेश म्हस्केंना शेवटच्या क्षणी उमेदवारी दिली ते विजयी झालेत.
  • दक्षिण मुंबईत शेवटच्या क्षणी यामिनी जाधवांना तिकीट दिलं, त्या पराभूत झाल्या.
  • उत्तर पश्चिम मुंबईतून शेवटच्या क्षणी रवींद्र वायकरांना तिकीट दिलं. ते 47 मतांनी विजयी झाले असून त्यांवर ठाकरे गटानं आक्षेप घेतलाय.

महायुतीत जागांवरुनही आतापासूनच रस्सीखेच सुरु झालीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव आत्रामांनी विदर्भातच 20 जागांची मागणी केली. याआधी भुजबळांनी महाराष्ट्रात 90 जागांची मागणी केली. आता शिंदेंच्या शिवसेनेचे संजय गायकवाडांनीही स्ट्राईकरेट सांगून100 जागांची मागणी केलीय.

लोकसभेच्या निवडणुकीत लढवलेल्या जागांपैकी कोणी किती जिंकल्या त्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर भाजपनं 28 जागा लढल्या. त्यापैकी 9 जागा जिंकल्या. 32.14 टक्क्यांचा स्ट्राईक रेट आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं 15 जागा लढून 7 जागा जिंकल्या, 46.66 टक्क्यांचा स्ट्राईक रेट आहे.
आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं 4 जागा लढून 1 जागा जिंकली. 25 टक्क्यांचा स्ट्राईक रेट आहे.

याच स्ट्राईक रेटचा दाखला देत, शिंदेंची शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढलीय. रामदास कदमांनी तर भाजप ऐवढ्याच समान जागांची मागणी केलीये.

महाराष्ट्रात लोकसभेत महाविकास आघाडी महायुतीवर भारी ठरली. मात्र शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आता उघडपणे, भाजपलाच जबाबदार धरण्यास सुरुवात केली.