मुंबई | 6 मार्च 2024 : मुंबईतल्या हॉटेल फोर सिझनमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली. लोकसभेच्या 48 जागांवर महाविकास आघाडीसह वंचितचाही फॉर्म्युला निश्चित होईल अशी शक्यता होती. मात्र 4 तास खलबतं करुनही अंतिम फॉर्म्युला काही महाविकास आघाडीनं जाहीर केलेला नाही. मात्र महाविकास आघाडीचे 2 फॉर्म्युल्याची माहिती सूत्रांकडून TV9ला मिळालीय. यातील पहिल्या फॉर्म्युल्यानुसार ठाकरेंची शिवसेना 23 जागा, काँग्रेस 15 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा मिळू शकतात. हा फॉर्म्युला मविआतील 3 प्रमुख पक्षांचा आहे. आता जर प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी सोबत आलीच तर दुसरा फॉर्म्युल्यानुसार, ठाकरेंच्या शिवसेनेला 20 जागा, काँग्रेसला 15 जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा आणि वंचित आघाडीला 3 जागा मिळू शकतात.
महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार, उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकरही हजर होते. मात्र सर्व जागांवर सकारात्मक चर्चा झाली असं सांगून मतभेद नाहीत अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलीय. दुसरीकडे आधी बैठकीला जाणार नाही असं सांगून प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर राहिले आणि तासभरातच आंबेडकर बैठकीतून बाहेरही पडले. आंबेडकरांनी बैठकीतून बाहेर येताच अजून काही ठरलेलं नाही हेही सांगितलं. म्हणजेच वंचितच्या दृष्टिनं बैठक सकारात्मक नव्हती.
आणखी एक बैठक होईल, त्या बैठकीत सर्व ठरेल असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ही बैठक 9 तारखेला होण्याची शक्यता आहे. याआधी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितकडून दिलेल्या प्रस्तावात 2 प्रमुख बाबी समोर ठेवण्यात आल्यात. एकट्या वंचितनं आणखी 27 जागांवर तयारी झाल्याचं म्हणत अधिक जागांचा दबाव टाकलेला आहे. त्यासोबतच निवडणूक आल्यावर भाजपसोबत जाणार नाही असं प्रतिज्ञापत्र लिहून द्या अशी अट आंबेडकरांची आहे. पण प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबतच आहेत, असा दावा राऊत वारंवार करतायत.
TV9ला मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीतल्या 3 प्रमुख पक्षांमध्ये अंतर्गत जागा वाटप झालेलं आहे. मात्र वंचित सोबत जागा वाटप आणि भाजपसोबत जाणार नाही अशी लिखीत अट, ठेवल्यानं अंतिम तोडगा काही निघताना दिसत नाही. त्यातच काँग्रेस-ठाकरे गट आणि काँग्रेस-शरद पवार गटातच काही जागांवरुन वाद असून त्यांचा तिढा सुटत नाही. तोपर्यंत आमचा तिढा सुटणार नाही, असं म्हटलंय.
महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत वंचितचा फॅक्टर महाविकास आघाडीसाठी किती महत्वाचा आहे हे 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीतुन स्पष्ट दिसते. लोकसभेच्या 9 मतदारसंघात वंचितमुळं काँग्रेस-राष्ट्रवादीला थेट फटका बसला. दीड लाखांच्या वरच वंचितनं मतं घेतल्यानं आघाडीचे उमेदवार पडले. 2019च्या विधानसभेतही 288 मतदारसंघापैकी 32 जागांवर वंचितमुळं काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाल्याचं आकडेवारीवरुन समोर आलं. 32 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार अगदी 5 ते 10 हजार मतांच्या फरकानं हरले आणि याच 32 मतदारसंघात वंचितच्या उमेदवारांनी 10 हजारांहून अधिक मतं घेतली.
मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीत स्वत: प्रकाश आंबेडकर उपस्थित राहूनही तोडगा निघत नसल्यानं, राऊतांनी अप्रत्यक्षपणे आंबेडकर भाजपला मदत करणार नाही म्हणत टोला लगावलाच. 9 तारखेला आणखी एक बैठक होणार आहे. त्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरही हजर राहतील. त्यानंतर वंचितबद्दल फुल अँड फायनल निर्णय होईल, असं तूर्तास तरी चित्र आहे.