देशाची आर्थिक राजधानी म्हटली जाणारी मुंबई सोमवारी पुन्हा एकदा जलमय झाली. सहा तासांमध्ये 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईची ‘तुंबई’ बनली. मुंबईत पडणाऱ्या वर्षभरातील पावसापैकी 10 टक्के पाऊस रविवारी रात्री ते सोमावारी सकाळी सात वाजेपर्यंत झाला. कारण भारत आणि जगभरातील शहरांप्रमाणेच मुंबईलाही हवामान बदलाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे त्याला इतरही कारणे आहेत.
26 जुलै 2005 मध्ये मुंबईत 24 तासांत 900 मिलीमीटर पाऊस झाला. एका दिवसांत झालेला हा पाऊस संपूर्ण जुलै महिन्यातील पाऊस होता. या पावसामुळे मुंबई ठप्प झाले होते. या पावसात 1094 लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच 500 कोटीचे नुकसान झाले होते. त्यानंतर मुंबईत काहीच बदल झाला नाही. जास्त पाऊस पडला की मुंबई ठप्प होते.
गेल्या काही काळापासून जपानच्या मदतीने मुंबईत भूमिगत पाईपलाईन (अंडरग्राउंड डिस्चार्ज चॅनल ) करण्यावर चर्चा सुरु आहे. जपाननेही टोकियो शहरात हा प्रकल्प तयार केला. कारण टोकियोमधील 3.5 कोटींहून अधिक लोकसंख्या नेहमीच पुराच्या धोक्यात राहते. यामुळे जपानने भूमिगत वाहिनी बनवली आहे. यामुळे पुराचे पाणी किंवा जास्तीचे पाणी या जलवाहिनीतून जाते आणि ते पंपाद्वारे इडो नदीत सोडले जाते.
मुंबईचा स्पंज सिटीप्रमाणे विकास करण्याचीही चर्चा आहे. स्पंज सिटी ही एक संकल्पना आहे ज्यामध्ये हे शहर स्पंजसारखे काम करते म्हणजेच आत पाणी टाकताच ते सुकते. याअंतर्गत शहराची रचना अशा पद्धतीने करण्यात येणार आहे की, पाणी लगेच जमिनीत जाईल आणि नाल्यांवर कोणताही भार पडणार नाही. यामध्ये ग्रीन स्पेस वाढविण्यात येणार आहे.