मुंबई: राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप करून मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिंग यांनी कोर्टातही धाव घेतली होती. आता त्यांनी सीबीआयकडे लेखी तक्रारही केली आहे. त्यामुळे पांडे यांच्या पुढील अडचणी वाढल्या आहेत. एवढेच नव्हे तर या प्रकरणात पांडे यांची सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तसे झाल्यास पांडे यांची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Will CBI investigate Director General of Police Sanjay Pandey?)
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग आणि महाविकास आघाडीत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केल्याचे पुरावे ‘टीव्ही9 मराठी’च्या हाती लागले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरूनच पांडे यांनी सिंग यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचं या पुराव्यातून स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनिल देशमुख प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.
सीबीआयकडे तक्रार
परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास समर्थ नसल्याचं संजय पांडे यांनी सरकारला कळवलं आहे. त्यांनी तसं सरकारकडे स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांनी पांडेंनी दबाव टाकल्याची लेखी तक्रार सीबीआयकडे दिली आहे. हे तक्रार पत्रचं ‘टिव्ही9 मराठी’च्या हाती लागलं आहे. तसेच सिंग आणि पांडे यांचे व्हॉट्सअॅप आणि फोनवरील संभाषणही ‘टीव्ही9 मराठी’च्या हाती लागलं असून त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस महासंचालक पांडे यांच्याकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारविरोधातील तक्रार कोणत्याही परिस्थिती मागे घ्या, असं सांगत पांडे यांनी माझ्यावर दबाव टाकला होता, असा दावा सिंग यांनी या पत्रात केला आहे.
तक्रार मागे घ्या, वरिष्ठ म्हणून सल्ला ऐका
एकटा व्यक्ती सगळ्या यंत्रणांच्या विरोधात लढू शकत नाही. जर कुणी लढलंच तर तो यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रार मागे घ्या, असं पांडे मला म्हणाले. त्यावर माझ्या वकिलाशी सल्लामसलत केल्याशिवया मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. तेव्हा असं न केल्यास तुम्हाला अनेक प्रकरणात अडकवलं जाईल. राज्य सरकारकडून क्रिमिनल अफेन्स दाखल केल्या जाईल. त्यामुळे तुम्हाला अनेक चौकश्यांना सामोरे जावं लागेल. जर तुम्ही तक्रार मागे घेतली तर या प्रकरणात मी तुम्हाला सर्वोतोपरी मदत करेल. वरिष्ठ म्हणून माझा सल्ला ऐका. अन्यथा तुम्ही खूप अडचणीत याल, असा सल्ला पांडे यांनी मला दिला होता, असं सिंग या पत्रात म्हणतात.
सिंग यांच्याकडे भक्कम पुरावा?
पांडे यांनी 15 एप्रिल रोजी व्हॉट्सअॅपवर मेसेज करून मला बोलावून घेतलं होतं. पांडे यांच्याशी माझी जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर मी थेट माझ्या वकिलाकडे गेलो, असंही सिंग यांनी म्हटलं आहे. सिंग यांनी व्हॉट्सअॅपवरील चॅट आणि फोनवरील संभाषणाच्या आधारे सीबीायकडे पांडेविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे या प्रकरणी सीबीआय पांडे यांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Will CBI investigate Director General of Police Sanjay Pandey?)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 3 May 2021 https://t.co/oYApazg3GI #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 3, 2021
संबंधित बातम्या:
मोठी बातमी: परमबीर सिंगांनी आमच्याकडून खंडणी उकळली; क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप
परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, पोलीस अधिकाऱ्याकडून पहिला गुन्हा दाखल
(Will CBI investigate Director General of Police Sanjay Pandey?)