मुंबई- शिवसेना, सहयोगी पक्ष आणि अपक्ष असे 50 आमदार फोडून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी त्यांचे राजकीय वजन दाखवून दिले आहे. या 50 आमदारांच्या गटामुळे तयांना राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले. विश्वासदर्शक ठरावावेळी एकनाथ शिंदे यांना सुमारे 165 मते मिळाले होती. सद्यस्थितीत शिंदे आणि भाजपा (BJP)मिळून 170 आमदारांचं बळ त्यांच्याकडे आहे. मात्र आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (President Election)एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना 200 मते मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. शनिवारी शिवसेना आणि भाजपा आमदारांच्या स्नेहभोजनावेळी त्यांनी हा 200 चा आकडा सांगितला आहे. राष्ट्रपती निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांची 16 मते जोडली तरी ही संख्या 185 च्या घरात जाते. अशा स्थितीत 200 मते मिळवण्यासाठी 15 मते जास्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना जास्त आणावी लागणार आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीसाठी मिशन 200 चे लक्ष्य एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. मात्र ही वरची 15 मते त्यांना हवी असल्यास ती त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच मिळवावी लागणार अशी चर्चा आहे. विधान परिषद निवडणुकीच्या वेळी भाजपाला काँग्रेसची काही मते गेल्याची शंका आहेच. ती संख्या 7 ते 8 आमदारांच्या घरात आहे. अशा स्थितीत आता उद्याच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काय होते, हे पाहावे लागणार आहे. सद्यस्थितीत कांग्रेसची 44 आणि राष्ट्रवादीची 53 मते आहेत. आता उद्या नेमकी ही मते कुणाला जाणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
उद्याच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहन प्रकाश यांनी बैठक बोलावली होती. त्याला 41 आमदार उपस्थित होते. उद्या काँग्रेसची 44 मते ही यशवंत सिन्हा यांनाच जातील, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. विधान परिषदेत जे क्रॉस वोटिंग झाले होते, त्याची माहिती मोहन प्रकाश यांनी घेतली असून, त्याबाबतही ते आमदारांशी वन टू वन चर्चा करत असल्याची माहिती भाई जगताप यांनी दिली आहे.