मुंबई : मराठा आरक्षणासंबंधी एक महत्त्वाची अपडेट आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावली आहे. ‘कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही’ असं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी ही माहिती दिली. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्या अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मात्र, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
बैठक संपल्यानंतर जयंत पाटील बाहेर आले. त्यावेळी त्यांना बैठकीत काय चर्चा झाली? काय ठरलं? असं विचारण्यात आलं. “काहीही घडलेलं नाही, आहे तीच परिस्थिती आहे. फक्त शांतता राखा, उपोषण मागे घ्या हा ठराव एकमुखाने या सर्वपक्षीय बैठकीत झाला” असं जयंत पाटील म्हणाले. कुणबीमधून मराठा समाजाला ससकट आरक्षण देता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याच जयंत पाटील म्हणाले. आरक्षणासाठी आयोग काम करतोय, असं जयंत पाटील म्हणाले.
स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्या” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. “मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, सहकार्य कराव” असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलय. “आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सहकार्य करा. सर्वसामान्य माणसाला अविश्वास वाटता कामा नय़े. सकल मराठा समाजाने सहकार्य करावं” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.