मुंबई- राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आणि झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray)हे पुन्हा सक्रिय झाले आहेत. राज्यात आगामी काळात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा रवींद्र नाट्य मंदिरात मुंबईत पार पडला आहे. पक्ष संघटना, आगामी निवडणुका याबाबत आजच्या या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar)यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वी राज ठाकरे यांनी राज्यात हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. मशिदीवरील भोंगे बंद केले नाहीत तर त्या मशिदींसमोर हनुमान चालिसा लावा, असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानंतर राज्यात बराच राजकीय वादजंग झालाय राज ठाकरे हिंदुत्वाचा आक्रमक मुद्दा उपस्थित करीत असल्याचे दिसले. गेल्या काही काळापासून राज ठाकरे आणि भाजपा (BJP)यांची जवळीकही सगळ्यांना पाहयला मिळते आहे. उद्या राज ठाकरे राज्यातील पदाधिकाऱ्यांना संबोधित करुन पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती नांदगावकर यांनी दिली आहे. त्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषदे घेणार आहेत, यात अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
आगामी मुंबई महापालिकेची निवडणूक मनसे स्वतंत्र लढवणार की भाजपासाबोत युती करुन लढवणार, याबाबत सगळ्यांना उत्सुकता आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा विजयाचा अश्वमेध रोखायचा विडाच भाजपाने उचललेला आहे. त्यासाठी भाजपाने गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मेळावे आणि कार्यक्रमही सुरु केले आहेत. मुंबई महापालिकेवर भाजपाचा भगवा फडकणारच आणि महापौरपदी भाजपाचाच नगरसेवक असेल, असा विश्वास आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त करीत आहेत. अशा स्थितीत मनसेची भूमिका महत्त्वाची असणार आहे. हिंदुत्वाच्या वाटेवर असलेले राज ठाकरे या निवडणुकीसाठी भाजपासोबत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे या प्रश्नाचे उत्तर देण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठे खिंडार पडलेले आहे. मोठ्या संख्येने आमदार आणि खासदार हे शिंदेंसोबत बाहेर पडलेले आहेत. अशा स्थितीत काहीश्या एकाकी पडलेल्या शिवसेनेला आगामी काळात भक्कम करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरेंना साद देणार का, असा प्रश्न राज्यातील जनतेच्या मनात आहे. याबाबत पुण्यात शर्मिला ठाकरे यांना विचारणा केली असता, साद घतर घालू द्या, मग पाहू असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. अशा स्थितीत अशी काही चर्चा या दोन्ही भावांमध्ये होणार का, हा प्रश्न पुन्हा एकदा जनतेच्या मनात निर्माण झालेला आहे. या प्रश्नाचे उत्तर उद्या राज ठाकरे देणार असल्याचेही बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे. यावर आत्ताच भाष्य करणे उचित होणार नाही, असेही ते म्हणाले. यैाबाबतचा प्रयोग यापूर्वी आपण करुन पाहिला होता, याची माहितीही नांदगावकर यांनी दिली आहे. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा भाजपाच्या खासदाराच्या विरोधामुळे होऊ शकला न्वहता. त्यामुळे राज ठाकरे भाजपावर नाराज असल्याचीही चर्चा आहे. अशा स्थितीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी काळात एकत्र येणार का, असा मुद्दाही उपस्थित करण्यात येतो आहे.
या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मनसेचा आगामी काळातील कार्यक्रम स्पष्ट होणार आहे. येत्या काळात मनसेचे नेते आणि नंतर राज ठाकरे हे महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती आहे. सध्याची राजकीय स्थितीत ही मनसेसारख्या पक्षाला राजकीय संधी असल्याचे राज ठाकरे यांचे मत आहे. अशा सूचनाच त्यांनी या बैठकीत त्यांनी केल्याची माहिती आहे. संपर्क वाढवा, असे आदेशही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. याच काळात मनविसेचे काम वाढवण्यासाठी अमित ठाकरे यांनी नुकताच कौकणाचा दौरा केला आहे. शिवसेनेला खिंडार पडलेले असताना मनसे आश्वासक रुपात समोर येण्याची शक्यताही वर्तवण्यात येते आहे.