विनायक डावरुंग, गिरीश गायकवाड, मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडेंपासून आपल्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला संरक्षण द्या, अशी मागणी प्रभाकर साईल यांनी केली आहे. साईल यांनी संरक्षण मिळावं म्हणून पोलीस आयुक्तालयात धावही घेतली आहे.
एनसीबीने क्रुझवर मारलेल्या धाडीतील प्रभाकर साईल साक्षीदार आहेत. त्यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल करून एनसीबीचा भांडाफोड केला होता. त्यानंतर ते संपर्काबाहेर होते. कालही त्यांना मुंबईच्या बाहेर राहावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.
समीर वानखेडे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे. कुटुंबीयांनाही धोका आहे. त्यामुळे मला संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी साईल यांनी केली होती. साईल यांनी आज सव्वा अकरा वाजता थेट पोलीस मुख्यालय गाठलं. पोलीस मुख्यालयात क्राईम ब्राँचचे प्रमुख मिलिंद भांबरे यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. यावेळी त्यांनी सोबत एक निवेदनही आणलं असून आपल्या कुटुंबीयांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच क्रुझवरील रेडपूर्वी आणि नंतर काय काय घडलं याची माहितीही ते पोलिसांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, प्रभाकर गेल्या चार महिन्यांपासून आमच्यासोबत राहत नाही. प्रभाकर अंगरक्षक म्हणून काम करतो. तो गेल्या 4 महिन्यांपासून आमच्या संपर्कात नाही, प्रभाकर घरात पैसेही देत नाही, असं प्रभाकरच्या आईने सांगितलं. प्रभाकर विवाहित आहे आणि त्याला दोन मुली आहेत. सध्या, काही कारणास्तव प्रभाकरची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहते. प्रभाकरची आई गेल्या अनेक वर्षांपासून आजारी आहे असे असूनही प्रभाकरने आपल्या आईला एकटे सोडले आहे. शेजारीच प्रभाकरच्या आईची काळजी घेत आहेत. प्रभाकरने केलेल्या आरोपाबद्दल त्याच्या आईला काहीच माहिती नाही.
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. केपी गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं साळी यांचा दावा आहे. आपण केपी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
त्यानंतर गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, त्यांचे हे फोटो मला दाखवण्यात आले होते. ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली आहे.
संबंधित बातम्या:
गोसावीच्या बॉडीगार्डचे एनसीबीविरोधात खळबळजनक दावे; नवाब मलिक म्हणतात, एसआयटीमार्फत चौकशी करा
रंगेल राजाचे 5000 महिलांशी लैंगिक संबंध, फीमेल हार्मोन्स शरीरात सोडून राजाला केलं ‘शांत’!