Worli Assembly Elections 2024 : वरळीत आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी महायुतीकडून मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा असतील. मिलिंग देवरा यांनीही ट्विट करुन आदित्य ठाकरेंना चॅलेंज दिलं आहे. वरळी आणि वरळीवासीयांना न्याय देण्याची वेळ आली आहे. आम्ही प्रयत्नशील आहोत. वरळीच्या विकासासाठी, आमचं व्हिजन लवकरच जाहीर करु. आता वरळी असं ट्विट त्यांनी केले आहे.
महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा हे रिंगणात असल्यानं आता वरळीची लढाई तिरंगी झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि मनसेकडून संदीप देशपांडे यांना तिकीट देण्यात आलं आहे.
मिलिंद देवरा लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आले आणि शिंदेंनी त्यांना राज्यसभेवर खासदारही केलं. पण वरळीतून टक्कर देणारा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना पुढं केलंय. मात्र राऊतांनी शिंदेंना टोला लगावला आहे.
वरळीत 2019 ला मनसेनं आदित्य ठाकरेंना पाठींबा दिला होता. पण आता राज ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांना तिकीट दिलंय. आता मिलिंद देवराही उतरल्यानं आदित्य ठाकरेंसमोर तगडं आव्हान आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. वरळीत अमराठी मतंही मोठी असून देवरांनी अमराठी मतांवर पकड आहे. वरळीत गुजराती मतदारांचीही संख्या निर्णायक ठरु शकतात. 2019 मध्ये सोप्या लढाईत आदित्य ठाकरे यांनी 89 हजार 248 मतं घेत विजय मिळवला होता. पण नुकत्याच झालेल्या दक्षिण मुंबई लोकसभा निवडणुकीत, वरळीतून ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी फक्त 6175 मतांवर आली. तसं पाहिलं तर भाजपकडून वरळीतून लढण्यासाठी शायना एनसी इच्छुक होत्या. मात्र जागाच शिंदेंच्या शिवसेनेकडे गेल्यानं शायना एनसींचा पत्ता कट झाला. पण एकनाथ शिंदे यांनी मिलिंद देवरा यांना उतरवून वरळीच्या लढाईत मोठा ट्विस्ट आणला आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्याआधी निवडणुकीच्या प्रचारात सगळेच पक्ष आपली ताकद दाखवणार आहेत.