रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. काल रात्री वयाच्या 86 व्या वर्षी रतन टाटा यांनी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज वरळीच्या पारसी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राजकीय सन्मानाने त्यांना शेवटचा निरोप देण्यात येईल. रतन टाटा यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी रतन टाटा यांचं पार्थिव प्रेयर हॉलमध्ये ठेवण्यात येईल.
रतन टाटा यांचं तिरंग्यामध्ये गुंडाळलेलं पार्थिव शरीर नरीमन पॉइंट येथील राष्ट्रीय प्रदर्शन कला केंद्रात (NCPA) ठेवण्यात आलं आहे. मोठ्या संख्येने लोक त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येत आहेत. दुपारी साडेतीनवाजेपर्यंत लोकांना रतन टाटा यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेता येईल. श्रद्धांजली वाहता येईल. संध्याकाळी 4 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
अंत्यसंस्काराची प्रक्रिया कशी असेल?
सर्वप्रथम रतन टाटा यांचं पार्थिव शरीर वरळीच्या पारसी स्मशानभूमीत आणलं जाईल. त्यानंतर त्यांचं पार्थिव प्रेयर हॉलमध्ये ठेवलं जाईल. 45 मिनिटं प्रेयर होईल. प्रार्थना हॉलमध्ये पारसी रीतिने ‘गेह-सारनू’ वाचन होईल. रतन टाटा यांच्या पार्थिव शरीर (चेहऱ्यावर) एक कापडचा तुकडा ठेऊन ‘अहनावेतीचा’ पहिला अध्याय वाचला जाईल. शांती प्रार्थनेचा हा एक भाग आहे. प्रेयर हॉलमध्ये जवळपास 200 लोग यावेळी उपस्थित असतील. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पार्थिव शरीर विद्युत दाहिनीत ठेवलं जाईल. त्यानंतर अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण होईल.
महाराष्ट्रात एक दिवसाचा दुखवटा
रतन टाटा यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने एका दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. या दिवशी राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये तिरंगा ध्वजा अर्ध्यावर उतरवण्यात येईल. महाराष्ट्रात आज कुठलाही मनोरंजनाचा कार्यक्रम होणार नाही.