मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्याच्या मुलाकडून हिट अँड रनचा प्रकार घडला आहे. या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांच्या मुलाच्या कारने वरळीतील दाम्पत्याला फरफटत नेलं. या अपघातात महिलेचा मृत्यू झालाय. पोलिसांनी या प्रकरणी राजेश शाह यांना ताब्यात घेतलं आहे. पण त्यांचा मुलगा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीचं नाव मिहीर शाह असं असल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपीने अपघातापूर्वी जुहूतल्या एका बारमध्ये मद्यप्राशन केल्याचीदेखील माहिती समोर येत आहे. या अपघातात कावेरी प्रदीप नाखवा (वय ४५ वर्षे) यांचा मृत्यू झाला. कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा हे माध्यमांसमोर आले. यावेळी पत्रकारांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रदीप यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. यावेळी प्रदीप यांना अश्रू अनावर झाले. ते ढसाढसा रडले.
“अहो, सकाळी आमची गाडी तिकडून येत होती. मी आणि माझी पत्नी दुचाकीवर होतो. 30 ते 35 च्या वेगाने आम्ही जात होतो. यावेळी अचानक मागून आरोपी गाडी घेऊन आला आणि त्याने आमच्या गाडीला धडक दिली. गाडीला धडकल्यानंतर आम्हाला समजलंच नाही की, काय झालं? आम्ही त्या बोनेटवर पडलो. त्यानंतर आम्ही त्याला हाक मारली की, थांब म्हणून. त्याने पटकन ब्रेक दाबला. ब्रेक मारल्यावर आम्ही दोघं जण खाली पडलो. मी डाव्या हाताला पडलो. तिला खेचणार तेवढ्यात त्याने गाडी तिच्या अंगावरुन नेली आणि तिला फरफटत नेलं. त्याने सीजी हाऊस ते सिलिंग किती अंतर आहे बघा. त्याने तिथपर्यंत तिला फरफटत नेलं. त्या बाईची काय अवस्था झाली असेल ते सांगा”, असं म्हणत प्रदीप रडू लागले.
“दोन मुलं टाकून केली. आमचं कमावणारं कोणी नाही. आमचा मच्छीचा धंदा आहे. आमचा उदरनिर्वाह त्याच्यावर आहे. त्या बाईच्या अंगावर कपडे राहिले नाही ते बोला. आज तुम्ही या पक्षाचे, त्या पक्षाचे बोलता, पण तुम्ही पाठीमागून त्यांना सपोर्ट करता. आम्हाला सपोर्ट करायला कोण असतं ते सांगा. आता तुम्ही नाही नाही बोलता, तो प्रवक्ता आला आणि बोलला. आता त्याच्या घरचं कोणी मेलं तर त्याला ते समजेल”, असं प्रदीप रडत-रडत म्हणाले.
“अहो, माझी बायको परत येणार आहे का? ते सांगा. आज ती मोठी लोकं आहेत, मोठ्या लोकांच्या पाठीमागे सगळी दुनिया आहे. गरिबांच्या पाठीमागे कोण आहे ते सांगा. आता तुम्ही सांगा त्याने पक्षाचं स्टिकर खोललं. तुम्ही गाडीचा काच बघा. त्या काचेला तुम्ही परवानगी देता?”, असा सवाल प्रदीप नाखवा यांनी केला.