वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी मिहिर शाह याला मुंबईतून अटक केली आहे. आरोपी मिहीर शाह अपघातानंतर फरार झाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. पण पोलिसांनी अखेर मिहिर शाह याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्यासह 12 जणांना अटक केली आहे. या 12 जणांना शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. या 12 जणांमध्ये मिहिर शाह याची आई आणि बहिणीचादेखील समावेश आहे. या 12 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मिहीर शाह याला पळून जाण्यासाठी मदत केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह याला ताब्यात घेतलं होतं. पण कोर्टाकडून त्यांना आज जामीन मंजूर झाला. यानंतर आता पोलिसांनी मिहीर शाह याला अटक केल्याची बातमी समोर येत आहे.
मुंबई पोलिसांनी अखेर वरळी हिट अँड रन प्रकरणात सर्वात मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलीस गेल्या दोन दिवसांपासून ज्याचा शोध घेत होते तो मुख्य आरोपी मिहीर शाह अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. मिहीर शाह याने भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली होती. विशेष म्हणजे तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला फरफटत नेलं होतं. त्याने धडक दिल्यानंतर गाडी थांबवली असती तर महिलेचे प्राण वाचू शकले असते. पण आरोपीने गाडी न थांबवता त्याने दूरपर्यंत महिलेला फरफटत नेलं. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी मिहीर शाह आपली गाडी मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे सोडून पळून गेला होता. त्याने तिथून पळून जाण्याआधी त्याचे वडील राजेश शाह यांच्यासोबत फोनवर बातचित केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आरोपी मिहीर शाह याने फोन स्विट्च ऑफ केला आणि तो पळून गेला होता. पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. पण तो सापडत नव्हता.
विशेष म्हणजे अपघातानंतर आरोपीचे वडील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मोठे नेते असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे नागरिकांकडून या घटनेवरुन राजेश शाह यांच्यावर टीका करण्यात आली. विरोधकांनीदेखील या घटनेवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुढे येत संबंधित घटनेतील आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही, हे स्पष्ट करावं लागलं. यादरम्यान पोलिसांनी घटनेची चौकशी करण्यासाठी राजेश शाह यांना अटक केली. तसेच घटनेच्या वेळी गाडीत असणारा ड्राव्हर राजेंद्रसिंग बिडावत यालाही ताब्यात घेण्यात आलं.