मुंबई : पश्चिम रेल्वेने गुरूवार दि.12 जानेवारीपासून पंधरा डब्यांच्या आणखी 12 फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या बारा फेऱ्यापैकी सहा फेऱ्या अप आणि सहा फेऱ्या डाऊन मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तसेच सहा फेऱ्या जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे गर्दीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वेवर येत्या 12 जानेवारीपासून पंधरा डब्यांच्या आणखी 12 फेऱ्या वाढणार आहेत. यामुळे प्रत्येक लोकलमागे प्रवासी वाहण्याच्या क्षमतेत 25 टक्के वाढ होणार आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची लोकलमधील गर्दीतून मधून काही प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत असल्याचे पश्चिम रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात मुख्य जनसंपर्क अधिकारी सूमित ठाकूर यांनी म्हटले आहे.
पश्चिम रेल्वेवरील 15 डब्यांच्या एकूण फेऱ्यांची संख्या 132 वरून 144 होणार आहे. पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकातील 12 डब्यांच्या लोकलचे पंधरा डब्यात रूपांतर केल्याने पश्मिम रेल्वेच्या एकूण फेऱ्यांची संख्या 1383 इतकीच राहणार आहे. त्यात पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या 79 फेऱ्यांची संख्याही कायम राहणार आहे. गेल्या 1 ऑक्टोबरपासून पश्चिम रेल्वेवर 79 एसी लोकलच्या फेर्या चालविण्यात येत असून 39 अप दिशेला तर 40 डाऊन दिशेला चालविण्यात येत आहेत.
रविवार, 15 जानेवरीला मुंबईत होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेणाऱ्यांसाठी पश्चिम रेलवे सकाळी विरार ते चर्चगेट तसेत चर्चगेट ते वांद्रे पर्यंत दोन अतिरिक्त धीमी लोकल ट्रेन चालविणार आहे. याशिवाय बोरीवलीवरून स. 03.45 वाजता सुटणारी बोरीवली-चर्चगेट अप लोकल रविवारी बोरीवलीहून पाच मिनटे आधी म्हणजे 03.50 वाजता सुटेल.