लाडकी बहीण योजना : ना रांगेची कटकट, ना कुणाची हांजी हांजी करायची… फक्त पाच मिनिटात असा भरा ‘या’ ॲपमधून अर्ज

| Updated on: Jul 08, 2024 | 9:08 PM

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सेतू कार्यालयांमध्ये मोठमोठी रांग लागलेली बघायला मिळत आहे. पण आता कुठे रांग लावण्याची किंवा कुणाला हांजी हांजी करायची गरज नाही. कारण महिला घरबसल्या अर्ज भरु शकणार आहेत.

लाडकी बहीण योजना : ना रांगेची कटकट, ना कुणाची हांजी हांजी करायची... फक्त पाच मिनिटात असा भरा या ॲपमधून अर्ज
फक्त पाच मिनिटात असा भरा 'या' ॲपमधून लाडकी बहीण योजनेचा अर्ज
Follow us on

महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 1500 रुपये मदत म्हणून दिले जाणार आहेत. या योजनेसाठी आता राज्यभरातील महिला अर्ज करत आहेत. यासाठी सेतू कार्यालयांमध्ये मोठमोठी रांग लागलेली बघायला मिळत आहे. पण आता कुठे रांग लावण्याची किंवा कुणाला हांजी हांजी करायची गरज नाही. कारण महिला घरबसल्या अर्ज भरु शकणार आहेत. तुम्ही नारीशक्त अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला मोबाईल नंबरच्या आधारावर लॉगिन करायचं आहे. लॉगिन केल्यानंतर महिलेची प्रोफाईल बनवण्याबाबत विचारलं जातं. प्रोफाईल बनवताना सर्वात आधी महिलेचं नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, नारीशक्ती प्रकार अशी माहिती भरावी लागते. नारीशक्ती प्रकारामध्ये वेगवेगळे प्रकार आहे. विवाहीत, अविवाहित, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक असे प्रकार आहेत.

महिला जर गृहिणी असेल तर गृहिणी किंवा सामान्य महिला यापैकी कोणतंही निवडा. या अ‍ॅपमध्ये पहिल्याच पेजवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं ऑप्शन देण्यात आलं आहे. या ऑप्शनवर क्लिक करा. इथे क्किल केल्यानंतर लगेच अर्ज ओपन होतो. यानंतर सर्व डिटेल्स भरायचे आहेत. या अर्जात आधीपेक्षा आता काही बदल करण्यात आले आहेत. याआधी अर्ज भरला असेल आणि नंबर जनरेट झाला असेल तर पुन्हा अर्ज भरण्याची अजिबात आवश्यकता नाही. आपली योजना यशस्वीपणे रजिस्टर झाली आहे. जे नव्याने अर्ज करत आहेत, त्यांनीच हा अर्ज भरायचा आहे. याआधी भरलेल्यांनी अर्ज भरायची गरज नाही.

फॉर्म कसा भरायचा?

  • सर्वात आधी महिलेचं आधारकार्डनुसार नाव भरायचं आहे. यानंतर पतीचे नाव टाकायचं आहे. यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव विचारण्यात आलं आहे. यानंतर महिलेचा जन्म दिनांक भरायचा आहे. यानंतर अर्जदाराचा पत्ता आधारकार्डनुसार भरायचा आहे. यानंतर जिल्हा, तालुका, शहर, ग्रामपंचायत, नगरपालिका आणि पिनकोडची माहिती भरायची आहे. पिनकोड टाकल्यानंतर महिलचा चालू मोबाईल नंबर भरायचा आहे. एकाच घरात जास्त महिला असतील त्यांनी वेगवेगळा मोबाईल नंबर द्यावा. यानंतर आधार क्रमांक भरावा.
  • यानंतर तुम्ही शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेतला आहे का? याची माहिती भरायची आहे. ज्या महिलांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजनांचा लाभ मिळतोय अशा वेगवेगळ्या योजनांबचा लाभ घेतला असेल तर माहिती द्यायची आहे. त्या योजनांमधून 1500 रुपयांपेक्षा कमी पैसे मिळत असतील तरच महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. यानंतर महिलेच्या वैवाहिक स्थितीची माहिती द्यावी लागेल. महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल होय असं उत्तर द्यायचं आहे. होय सिलेक्ट केल्यानंतर राज्य सिलेक्ट करायचं आहे.
  • अर्ज भरताना बँक खात्याचा तपशील द्यायचा आहे. यावेळी बँकेचे पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव, बँक खातेक्रमांक, आयएफएससी कोड याची माहिती द्यायची आहे. तसेच आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला गेला आहे का? याची माहिती द्यायची आहे. यानंतर आधारकार्ड, अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक प्रमाणपत्र, तसेच उत्पन्नाचं प्रमाणपत्र/केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड याचे फोटो अपलोड करायचे आहेत. फोटोची साईज ही 5 MB इतकी असावी.
  • एक महत्त्वाचं म्हणजे अधिवास प्रमाणपत्र/जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला यावर क्लिक केल्यानंतर दस्तावेज स्त्रोत निवडा असं विचारलं जातं. यामध्ये 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड किंवा मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला याचा फोटो अपलोड करायचा आहे. अर्जराच्या हमीपत्राची प्रिंट काढायची आहे, तो अर्ज भरायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. यानंतर बँक पासबुकचा फोटो जोडायचा आहे. यानंतर महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्रे द्यायचे आहेत. यामध्ये 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला द्यायचा आहे. हमीपत्र स्वीरायचं आहे. त्यानंतर अर्ज सबमीट होईल.
  • दरम्यान, काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, रात्री अकरा किंवा बारा वाजेनंतर आणि सकाळी सहा वाजेच्या आधी फॉर्म भरला तर फार अडचणी येत नाहीत. किंवा फॉर्म भरण्याची घाई करु नका. सरकार सातत्याने अपडेट टाकत आहे. त्यामुळे दोन आठवडे थांबल्यास अर्ज भरणाऱ्यांचं प्रमाण कमी होईल. त्यामुळे सर्व्हर डाऊनचा इशू होणार नाही.