मुंबई : ‘मातोश्री’च्या अंगणातील अर्थात वांद्रे पूर्व मतदारसंघातील कॉंग्रेस आमदाराने ‘कोरोना’बचावासाठी अँक्शन प्लॅन आखला आहे. यंदाच्या विधानसभेतील सर्वात तरुण आमदार झिशान सिद्दीकी यांनी संपूर्ण पगार मतदारसंघाला देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. (Zeeshan Siddique action Plan for Corona)
‘मी माझे संपूर्ण आमदार वेतन आपला मतदारसंघ आणि माझ्या जनतेला देण्याचे आश्वासन दिले होते. माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघामधील मतदारांसाठी मास्क आणि सँनिटायझर्स खरेदी करण्यासाठी वेतनाचा काही भाग खर्च करणार आहे. आम्ही शनिवारपासून हे वितरण सुरु करु. 30 हजार मास्क आणि 3 हजार मिली सँनिटायझर्स वाटले जाईल, अशी माहिती झिशान सिद्दीकी यांनी ट्विटरवरुन दिली.
I had promised to donate my entire MLA personal salary to my constituency & my people.
Will be spending a part of it to buy masks and sanitizers for people in my Bandra East assembly. We will be distributing these from Saturday!
Starting with 30000 masks and 3000 ML of sanitizers— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) March 19, 2020
महाराष्ट्रात कोरोना हातपाय पसरण्याआधी वेळीच आळा घालण्याची आवश्यकता आहे. गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आरोग्य, स्वच्छता, पोलिस अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना मास्क वापरुन स्वच्छता बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.
दरम्यान, झिशान सिद्दीकी हे मुंबईचे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि वांद्रे पूर्व मतदारसंघातील शिवसेनेच्या तत्कालीन आमदार तृप्ती सावंत यांना पराभवाची धूळ चारुन विजयी झाले होते. ‘मातोश्री’च्या अंगणातच पराभव स्वीकारावा लागण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढवली होती.
27 वर्षीय झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचे पुत्र. निवडणुका झाल्या त्यावेळी शिवसेना भाजपसोबत युतीमध्ये लढली होती, तर कॉंग्रेस राष्ट्रवादी एकत्र होते. झिशान हे ठाकरे कुटुंबाच्या मतदारसंघात असल्याने पाच वर्षांनी त्यांनी मला मतदान करावं, इतकं चांगलं काम करण्याची माझी इच्छा आहे, असं ते निकालानंतर म्हणाले होते. मात्र सत्ता पालटली आणि आता शिवसेना कॉंग्रेस राष्ट्रवादी यांनीच एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आहे.
Zeeshan Siddique action Plan for Corona