मुंबई : शिवसेनेमध्ये प्राण फुंकण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केलेत. ते आता शिवसैनिकांना भेटी देताना दिसतात. युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा शनिवारी, 9 जुलै रोजीचा दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यानुसार, आदित्य ठाकरे शनिवारी, सकाळी 11 वाजता बुद्ध गार्डन (Buddha Garden) येथील विकास कामाचं (Development work) लोकार्पण करतील. त्यानंतर 11:20 वाजता अभ्यास (study) गल्लीचं लोकार्पण करतील. शनिवारी 11:40 वाजता वरळी नाका ते लोवर परळ रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या गणपतराव कदम मार्गावरील विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शिवसैनिकांना यानिमित्त प्रत्यक्ष भेटता येणार आहे. शिनसैनिकांचं काय म्हणण आहे, हेही त्यांनी प्रत्यक्ष ऐकता येणार आहे.
युवासेना प्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला आजपासून सुरुवात झाली. आदित्य ठाकरे यांनी भायखळा येथील शाखा क्र. 216 ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांवर बोलताना आजारपणाचा फायदा घेत घात केला अशी भावनिक प्रतिक्रिया दिली. जे कोणी मातोश्रीवर येत आहेत त्यांची निष्ठा आम्हाला कळतेय. महाराष्ट्रातील सगळे नागरिक उद्धव साहेबांसोबत उभे आहेत. त्यांनी जो काही आम्हाला धोका दिला आहे त्याबद्दल दुःख नक्कीच आहे. त्यांच्या चेहर्यावरील भाव पाहून मी असेल किंवा उद्धव साहेब असतील आमच्या सारख्या चांगल्या लोकांना राजकारणात जागा आहे का हा प्रश्न आता पडला आहे. हे दुर्दैव आहे. आम्ही जेव्हा जागोजागी फिरतो तेव्हा लोक येऊन भेटतात. तेव्हा कळते की मागील दोन-अडीच वर्षात जे काही काम झाले ते जनतेने पाहिले आहे, असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की, ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांना आम्ही सर्व काही दिले आणि त्यांनीच आम्हाला धोका दिला. कुठे काय जोडायचे त्याला तुम्हीच पहा; पण महत्त्वाचा प्रश्न हा आहे की देशात लोकशाही आता राहिली आहे का? अशी खंत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. मतदारांनी पक्षाचे चिन्ह पाहून मतदान केले. त्यामुळे मतदारांनी निवडून आणलेले हे आमदार फुटले तर देशात लोकशाही राहिली आहे का असा प्रश्न निर्माण होतो. असं आमदारांना पळवून घ्यायला लागले तर देशात लोकशाही जीवंत राहील का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.