मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले युवासेनेचे नेते राहुल कनाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या चर्चांवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. “ठाकरे गटाला आता अनेक धक्के बसणार”, अशी सूचक प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी राहुल कनाल यांच्या प्रश्नावर दिली आहे. तर दुसरीकडे राहुल कनाल यांनी याबाबतच्या चर्चांवर एका वाक्यात उत्तर दिलं आहे. “मी माझा निर्णय लवकरच जाहीर करेन”, असं राहुल कनाल यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राहुल कनाल यांच्याबाबतच्या प्रश्नांना चांगलंच उधाण आलं आहे.
“एकनाथ शिंदे यांचा जनाधार आणि विश्वास दररोज वाढतोय. नवी माणसं रोज मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत जोडली जात आहेत. आमदार, खासदार, नगरसेवक यांचा मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरु आहे”, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.
राहुल कनाल नाराज असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. ते युवासेनेच्या कोअर कमिटीच्या व्हाट्सअॅप ग्रुपवरुन लेफ्ट झाले, अशी देखील माहिती समोर आली होती. संघटनेतील अंतर्गत कुरघोडींना कंटाळून ते व्हाट्सअॅप ग्रुपमधून बाहेर पडल्याची चर्चा होती.
युवासेनेतले अमेल घोले, सिद्धेश कदम, समाधान सरवणकर यांनीही नाराजी व्यक्त करत युवासेना सोडली होती. त्यानंतर आता राहुल कनाल हे शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत.
महाविकास आघाडीचं सरकार असताना राहुल कनाल यांची शिर्डी संस्थानचे विश्वस्त म्हणून वर्णी लागली होती. या दरम्यान त्यांच्याशी संबंधित ठिकाणी आयकर विभागाने छापा टाकला होता. त्यानंतर ते राजकारणात फार सक्रिय नसल्याची चर्चा होती. पण नंतर ते वांद्रे पश्चिम विधानसभेसाठी तयारी करत असल्याची चर्चा समोर आलेली. आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील तर त्यांना विधानसभेच्या निवडणुकीचं तिकीट मिळतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.