वांद्रे पूर्व मतदारसंघाचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर 5 दिवसांनी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे. झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दी यांचे चिरंजीव आहेत. झिशान यांनी आपल्या वडिलांच्या हत्येनंतर पाच दिवसांनंतर ट्विट करत न्यायाची मागणी केली आहे. झिशान यांनी काल आणि आजदेखील पोलीस ठाण्यात जाणून पोलिसांच्या चौकशीला सहकार्य केलं आहे. तसेच झिशान यांच्यासोबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला असता आपण योग्यवेळी प्रतिक्रिया देऊ, असं झिशान म्हणाले होते. यानंतर झिशान यांनी ट्विट करत आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी केली आहे.
“माझ्या वडिलांना लोकांचं संरक्षण करताना आणि निर्दोष गरीब लोकांची घरं वाचवताना जीव गमावला. आज माझे पूर्ण कुटुंब कोलमडलं आहे. पण माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण व्हायला नको. त्यांचं बलिदान व्यर्थ जायला नको. मला न्याय हवाय, माझ्या कुटुंबाला न्याय हवाय”, असं ट्विट झिशान सिद्दीकी यांनी केलं आहे.
My father lost his life protecting and saving the lives and homes of poor innocent people. Today, my family is broken but his death must not be politicised and definitely not go in vain.
I NEED JUSTICE, MY FAMILY NEEDS JUSTICE!— Zeeshan Siddique (@zeeshan_iyc) October 17, 2024
झिशान सिद्दीकी यांच्याकडून दोन दिवस मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर महत्वाचे ट्विट करण्यात आले आहे. झिशान सिद्दीकी यांच्या ट्वीटमधून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण सांगण्याचा प्रयत्न झालाय का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. सिद्दीकी यांनी केलेल्या ट्विटमध्ये माझ्या वडिलांनी गरीब निष्पाप लोकांची घरी वाचवताना जीव गमावला असे म्हटल्याने त्यांच्या हत्येमागे तेच कारण असल्याचा अंदाज आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे एसआरएचाच मुद्दा असण्याची अधिक शक्यता आहे. मुंबई पोलिसांकडून तपासातली माहिती जाणून घेतल्यानंतर झिशान यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विटमुळे चर्चेला जोर आलं आहे.
बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी रात्री दहा वाजेच्या सुमारास तीन आरोपींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी कार्यालयातून बाहेर पडले असता अज्ञात तीन आरोपींनी रिक्षातून येऊन बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला होता. या गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं होतं. बाबा सिद्दीकी यांच्यावर हत्या करणाऱ्या आरोपींचा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याची चर्चा आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे.