नाशिक जिल्ह्यातील कांद्याने लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडीला झटका दिला. कांदा निर्यातीसंदर्भात घेतलेल्या धोरणामुळे लोकसभा निवडणुकीत एनडीएला फटका बसला. आता नाशिकमधील कांद्याचा घोटाळा समोर आला आहे. कांदा घोटाळ्याची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. जूनमध्ये नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी केलेल्या पाहणीत देखील नाफेडच्या कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याचे उघड झाले होते. नाफेडच्या कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याचा समोर आल्यानंतर काही दिवसांपूर्वीच नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती.
नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. तब्बल ६ हजार शेतकऱ्यांच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर समोर आली आहे. व्हायरल यादीमध्ये यावर्षीच्या १८ मे ते २० जुलै पर्यंतच्या कांदा खरेदीची माहिती दिली आहे. कांदा खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा नोंदीपुढे शून्य आणि केवळ ७/१२ अशी नोंद असे दाखवले आहे. तसेच वजन केलेल्या ठिकाणी डमी अशी नोंद केली आहे.
कांदा खरेदीत एकाच घरातील अनेक सदस्यांची नावे आहेत. ६ हजार ४१५ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केल्याचा तपशील यादीवरुन दिसत आहे. या यादीतील घोळावरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. नाफेडच्या कांदा खरेदीवर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने घोटाळ्याचे आरोप होत आहे. आता व्हायरल यादीतून कांदा खरेदीतील मोठा भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
नाफेडमध्ये शेतकऱ्यांचा कांदा न घेता व्यापाऱ्यांचा कांदा घेतला गेला आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी महासंघाचा कांदा घेतला गेला. त्याची यादी व्हायरल होत आहे, असा आरोप शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी ईडी अन् सीबीआयमार्फत करावी, अशी मागणी कांदा उत्पादक संघटनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले. तसेच जोपर्यंत कांद्याला सहा हजार रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणू नये, असे सांगितले आहे.