गजानन उमाटे, नागपूर : राज्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. या निकालानंतर सरकारला धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहे. आता राज्याच्या विस्तारासोबत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासंदर्भात सत्ताधारी आमदारांकडूनही वेगवेगळे दावे केले जात आहे. मंत्रिपदासाठी आमदारांकडे पैशांची मागणी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपच्या चार आमदारांकडे पैशांची मागणी करण्यात आली आहे.
कोण केली मागणी
भारतीय जनता पक्षाच्या आमदाराकांडे पैशांची मागणी करण्यात आली आहे. परंतु ही मागणी पक्षातून करण्यात आली नाही तर एका भामट्याने केली आहे. त्याने चक्का पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे नाव वापरुन पैशांची मागणी केली आहे. स्वत:ला जे पी नड्डा यांचा सहायक असल्याचा बनाव करत त्याने पैशांची मागणी केली. अखेर या भामट्याला अटक झाली आहे.
काय आहे प्रकार
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहायक असल्याचे सांगून मंत्रीपद मिळवून देण्यासाठी राज्यातील चार आमदारांकडे केली पैशाची मागणी करण्यात आली. नागपुरातील भाजपचे आमदार विकास कुंभारे, भाजप आमदार टेकचंद सावरकर यांना काही दिवसांपूर्वी फोन आला होता. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे नाव निरज सिंह राठोड असल्याचे सांगत आपण भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे म्हटले. मंत्रीपदासाठी पक्षनिधी म्हणून पावणेदोन कोटी रुपये देण्याची मागणी त्याने केली. आमदार तानाजी मुरकुटे आणि नारायण कुचे या राज्यातील आणखी दोन आमदाराकडे निरजने कोटय़वधींची मागणी केली
कसा झाला प्रकार उघड
आमदार विकास कुंभारे यांना या प्रकरणात संशय आला. त्यांनी वरिष्ठांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीसांत तक्रार केली. पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची वेगाने चौकशी सुरु केली. अखेर या प्रकरणात गुजरातमधून एकास अटक करण्यात आली. निरज सिंह राठोड याला मोरबी, अहमदाबाद येथून त्याला अटक केली.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल. राज्यात कोणाला मंत्री करावे, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ठरवतील. येत्या दहा दिवसांत हा विस्तार व्हावा, अशी मला अपेक्षा असल्याचे संजय शिरसाट यांनी नुकतेच सांगितले होते. यावेळी राज्य मंत्रिमंडळात २० जणांना संधी मिळणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाही दोन मंत्री शिवसेनेचे होतील, असे त्यांनी सांगितले.