नागपूर शहरात 2019 मधील प्रकरणात अधिष्ठातासह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजनी पोलिसात हा गुन्हा दाखल होतात वैद्यकीय क्षेत्रात खडबळ उडाली आहे. शस्त्रक्रियेदरम्यान निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाला आहे. शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने 30 जून 2020 रोजी अजनी पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर काहीच कारवाई न झाल्याने त्या महिलेच्या कुटुंबियांनी न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झाला आहे.
जिल्हा न्यायालयाचे सेवानिवृत्त अधीक्षक केवलराम पांडुरंग पटोले यांनी ही तक्रार दिली होती. त्यांची पत्नी पुष्पा यांच्या मानेवर गाठ होती. त्यासंदर्भात त्यांनी डॉ. राज गजभिये यांना दाखविले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केले. परंतु नातेवाईकांना भेटू दिले नाही तसेच दुसऱ्या दवाखान्यात नेऊ दिले नाही. रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी निष्काळजीपणा लपविण्यासाठी त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराने झाल्याचे म्हटल्याचा आरोप पटोल यांनी तक्रारीत केला.
केवलराम पटोले यांनी डॉ.गजभिये व इतर डॉक्टरांविरोधात पोलिसात तक्रार दिली. त्यावर नेमलेल्या चौकशी समितीनेही कार्डिॲक अटॅकने मृत्यू झाल्याचे म्हटले. त्यानंतर पटोले यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना अहवालाचे पुनरावलोकन करण्याचा अर्ज दिला. पुन्हा वैद्यकीय शिक्षण संचालकांनी पाच डॉक्टरांची समिती नेमली. या समितीने डॉक्टरांनी रुग्णाची काळजी घेण्यात निष्काळजीपणा केल्याचा अहवाल दिला. या प्रकरणात पटोले न्यायालयात गेले. न्यायालयाने डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. अजनी पोलीस ठाण्यात या ११ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
डॉ.राज गजभिये यांच्यासह डॉ.भुपेश तिरपुडे, डॉ.हेमंत भनारकर, डॉ.वासुदेव बारसागडे, डॉ.अपुर्वा आनंद, डॉ.सुश्मिता सुमेर, डॉ.विक्रांत अकुलवार, डॉ.गायत्री देशपांडे, डॉ.गिरीश कोडापे, डॉ.विधेय तिरपुडे व डॉ.गणेश खरकाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.