Vidhan Sabha Election 2024: मविआच नव्हे तर राज ठाकरेही देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणार? फडणवीस यांच्या मतदार संघात अशी रंगणार लढत

| Updated on: Oct 15, 2024 | 1:15 PM

Nagpur South West Assembly constituency Election 2024: संमिश्र वस्ती असलेल्या या मतदार संघात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच नाही तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भाजपचा विजय प्रतिष्ठेचा आहे. फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष मिळून आघाडी उघडणार आहे. त्यावेळी फडणवीस यांचे मित्र राज ठाकरेसुद्धा त्यांच्या विरोधात प्रचार सभा घेण्याची शक्यता आहे.

Vidhan Sabha Election 2024: मविआच नव्हे तर राज ठाकरेही देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणार? फडणवीस यांच्या मतदार संघात अशी रंगणार लढत
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ देवेंद्र फडणवीस
Follow us on

Nagpur South West Devendra Fadnavis Assembly constituency : महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, मुख्यमंत्री पदाचे दावेदार अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांचे विश्वासू व्यक्तीमत्व असलेले देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढत असतात. हा मतदार संघ भाजपसाठी अन् राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महत्वाचा आहे. कारण भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूरमध्ये आहे. संघाच्या संघटन कौशल्याचा फायदा भाजपला नागपूरमध्ये अधिक होत असतो. या मतदारचा इतिहास पहिल्यावर त्यावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे. 1978 पासून या मतदार संघात 7 वेळा भाजपने विजय मिळवला. 2 वेळा काँग्रेसने भाजपला रोखले. परंतु 2024 ची लढत भाजपसाठी सोप असणार नाही. यंदा फक्त भाजपचेच नाही तर देवेंद्र फडणवीस यांचे मित्र असलेले राज ठाकरे यांच्या मनसेचे आव्हान भाजपला असणार आहे. यंदा देवेंद्र फडणवीस विरोधात मनसेकडून उमेदवार देण्याची तयारी चालली आहे. त्यासाठी नाव निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे राज्यात भाजपची अन् महायुतीची धुरा सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आपल्या मतदार संघावर लक्ष द्यावे लागणार आहे.

असा आहे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघचा इतिहास

नागपूर पश्चिम मतदारसंघ कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्याला सुरुंग 1990 मध्ये विनोद गुडधे पाटील यांनी लावला. त्यांनी या ठिकाणी पहिल्यांदा भाजपचे कमळ फुलवले. त्यानंतर 1995 मध्ये सुद्धा त्यांनाच यश मिळाले. त्यावर्षी राज्यात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली. त्यामुळे विनोद गुडधे पाटील यांना राज्यमंत्री करण्यात आले. परंतु भाजप नेत्यांशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये भाजपने नागपूर पश्चिमचा आपला गड नागपूरचे युवा नेते आणि महापौर देवेंद्र फडणवीस यांना दिला. मग देवेंद्र फडणवीस यांनी 1999 आणि 2004 दोन्ही वेळा या ठिकाणी सहज विजय मिळवला. 2009 मध्ये मतदारसंघाची फेररचना झाली. नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील काही भाग काढून नागपूर दक्षिण-पश्चिम हा नवा मतदारसंघ तयार झाला.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ

फेररचनेनंतरही मतदार संघात भाजपचे वर्चस्व

2008 मध्ये केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात नागपूर महानगरपालिकेच्या वॉर्ड क्र. 12 ते 16, 43 ते 51, 79 ते 82 आणि 103 ते 105 यांचा समावेश होतो. नागपूर दक्षिण पश्चिम हा विधानसभा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. लोकसभेतून नितीन गडकरी निवडून गेले आहे. विधानसभेचे प्रतिनिधीत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघ 2008 मध्ये तयार झाला. फेररचनेनंतर झालेल्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2009 मध्ये भाजपने या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस यांना रिंगणात उतरवले. तेव्हापासून आजपर्यंत तेच या मतदारसंघातून सातत निवडून येत आहे. 2009, 2014 आणि 2019 मध्ये त्यांना या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. आता 2024 मध्ये तेच या मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहे.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख लढत होणार

अशा रंगल्या लढती

२००९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास पांडुरंग ठाकरे उमेदवार होते. फडणवीस यांना ८९,२५८ मते मिळली तर ठाकरे यांना ६१,४८३ मते मिळाली होती. त्यानंतर २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने प्रफुल्ल पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ५४,९७६ मते मिळाली तर देवेंद्र फडणवीस यांना १ लाख १३ हजार ९१८ मते मिळाली होती. २०१९ मध्ये या मतदारसंघात एकूण ३ लाख ८४ हजार ३५५ मतदार होते. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आशीष देशमुख यांना मैदानात उतरवले होते. या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनीच पुन्हा बाजी मारली. त्यांना १ लाख ९ हजार २३७ मते मिळाली होती. आशीष देशमुख यांना ४९ हजार ३४४ मते मिळाली होती. देवेंद्र फडणवीस यांनी विजयी आलेख कायम ठेवला. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या मतांमध्ये घट होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही या मतदार संघात भाजपच्या मतांमध्ये घट झाली आहे. यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून भाजपला ६५ हजार मते मिळाली होती. आता मात्र केवळ ३३ हजार मते मिळाली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे.

नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघाचा २०१९ मधील निकाल
उमेदवार मते पक्ष
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस १०९२३७ भाजप
डॉ आशिष देशमुख ५९८९३ काँग्रेस
रवी अल रवींद्र पायकुजी शेंडे ८८२१
वंचित बहुजन आघाडी
विवेक विनायक हाडके ७६४६ बसपा
नोटा ३०६४
अमोल भीमरावजी हाडके ११२५ आप
संजीव ताराचंद तिरपुडे 218
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे)
या मतदार संघात एकूण २१ उमेदवार होते.

देवेंद्र फडणवीस विरोधात महाविकास, मनसे अन् वंचित

राज्याच्या निवडणुकीची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असते. राज्यभर त्यांचे झंझावत प्रचार दौरे असतात. परंतु आता देवेंद्र फडणवीस यांना मतदार संघात गुंतवून ठेवण्याची रणनीती महाविकास आघाडीनेच नव्हे तर राज ठाकरे यांच्या मनसेसुद्धा आखली आहे. महाविकास आघाडी आता एकत्र आहे. काँग्रेस सतत या ठिकाणावरुन पराभूत होत असल्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना या मतदार संघातून निवडणूक रिंगणात उतरवणार आहे. यामुळे विद्यमान गृहमंत्री विरुद्ध माजी गृहमंत्री अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते प्रफुल गुढगे यांनी गेल्या दोन-तीन वर्षांपासून तयारी सुरु केली आहे. ते मतदारसंघात खूप सक्रिय आहेत. त्यांना माजी मंत्री सुनील केदार यांची मदत मिळणार असल्याची चर्चा आहे. परंतु मविआतून ही जागा काँग्रेस ऐवजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची मैत्री असताना आता राजकारणात राज ठाकरे मैत्री बाजूला ठेवणार आहे. मनसे यावेळी विधानसभा निवडणुकीत २३० ते २४० उमेदवार मैदानात उतरवणार असल्याचे राज ठाकरे यांनी विदर्भ दौऱ्यात सांगितले होते. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. यामुळे मनसे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात मनसे तुषार गिरे यांना मैदानात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचा परिणाम देवेंद्र फडणवीस यांना मिळणाऱ्या मतांमध्ये आणखी घट होणार आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने विनय भांगे यांना या मतदार संघात उमेदवारी दिली आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस

फडणवीस यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत

पश्चिम नागपूर हा शहरातील इतर भागांच्या तुलनेत विकसित भाग आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचे मतदारही मोठ्या संख्येने या मतदार संघात आहे. तसेच मुस्लिम, ख्रिस्ती मतदारही आहेत. मराठी भाषिक आणि हिंदी भाषिक मतदार आहेत. संमिश्र वस्ती असलेल्या या मतदार संघात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच नाही तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी भाजपचा विजय प्रतिष्ठेचा आहे. फडणवीस यांच्या विरोधात महाविकास आघाडीत तिन्ही पक्ष मिळून आघाडी उघडणार आहे. त्यावेळी फडणवीस यांचे मित्र राज ठाकरेसुद्धा त्यांच्या विरोधात प्रचार सभा घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची लढत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सोपी असणार नाही. महाराष्ट्रात प्रचार दौरा आणि पक्षाची सूत्र सांभाळताना त्यांना आपल्या मतदार संघावर लक्ष ठेवावे लागणार आहे.