नागपूर : नागपूर शहरातील सुरक्षित वाहतूक व्यवस्थेसंदर्भात आयरास्ते (Intelligent Solutions for Road Safety through Technology & Engineering) या केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या प्रकल्प पदाधिका-यांनी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्यापुढे सादरीकरण सादर केले. आयुक्त सभागृहामध्ये झालेल्या सादरीकरणावरील चर्चेदरम्यान मनपा आयुक्तांनी मुख्य अभियंता प्रदीप खवसे, कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे, उपअभियंता श्रीकांत देशपांडे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण, अजय मानकर, गिरीश वासनिक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, वाहतूक पोलीस अधिकारी, आयरास्ते प्रकल्पातर्फे INAI चे सीईओ वर्मा कोनाला (Varma S. Konala), आयआयआयटी हैदराबादचे गोपीनाथ चापिडी (Gopinath Chappidi), इनाइ (INAI) चे प्रधान सचिव डॉ. अंबू मनी सुब्रमण्यन, सीआरआयए चे मुख्य सचिव डॉ. वेलन्यूरन सेनापती, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद परिवहन मंत्रालय भारत सरकारचे सदस्य राजू वाघ आदी उपस्थित होते. ग्रे स्पॉट संबंधी अधिक जनजागृती होऊन सुरक्षित वाहतूक व्हावी यासाठी आयरास्तेला राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद परिवहन मंत्रालय भारत सरकारचे सदस्य राजू वाघ यांच्याद्वारे सहकार्य केले जात आहे. त्यांनी संभाव्य अपघातप्रवण स्थळाच्या परिसरात सर्वे करून नागरिकांना सुरक्षित वाहतुकीसाठी मानसिकता तयार करून त्यांना 21 दिवस वाहतूक नियमांच्या पालनाची शपथ देण्यात आल्याचे श्री. वाघ यांनी सांगितले.
यावेळी मनपा आयुक्तांसह सर्व अधिका-यांना नागपूर शहरातील ब्लॅक स्पॉट आणि ग्रे स्पॉटची माहिती देण्यात आली. ज्या भागावर सतत अपघात होतात, जिथे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे, जिथे अनेक अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे असे नागपूर शहरातील 37 ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आलेली आहेत. ब्लॅकस्पॉट म्हणजे ज्या भागात अपघात जास्त होतात, अशी ठिकाणं. यामध्ये नागपूर शहरात मनपा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य महामार्ग प्राधिकरण यांच्या अंतर्गत येणारी ब्लॅकस्पॉट आहेत. यापैकी चिखली, पारडी हनुमान मंदिर चौक, प्रकाश हायस्कूल, म्हाळगीनगर या चार ठिकाणांवर तयार करण्यात आलेला सुरक्षा अहवालावर ‘आयरास्ते’द्वारे सादरीकरण करण्यात आले. शहरातील संपूर्ण 37 ब्लॅक स्पॉटवर सुक्ष्मरित्या अहवाल तयार करण्यात आला. ते सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी ‘आयरास्ते’च्या अधिका-यांनी सांगितले.
याशिवाय ज्या रस्त्यांवर अपघाताची शक्यता आहे, जिथे अंमलबजावणी केल्यास अपघात टाळता येईल, अशी संभाव्य अपघातप्रवण स्थळे अर्थात ग्रे स्पॉटची सुद्धा यावेळी माहिती देण्यात आली. नागपूर शहरात 20 ग्रे स्पॉट निश्चित करण्यात आले. ब्लॅक स्पॉट आणि ग्रे स्पॉट सुरक्षित करण्याच्या दृष्टीने उपाय योजना सुचविण्यात येत आहे. त्यामुळे या भागातील अपघात कमी होऊन सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. याशिवाय ‘आयरास्ते’द्वारे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने वाहनांमध्ये उपकरणे लावून ते चालविणा-या वाहकांचा अभिप्राय नोंदविला. सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने उपकरणाद्वारे वाहकांना आगाऊ सूचना दिली जाते. त्यांनी त्याचा योग्य दखल घेऊन सुरक्षित वाहतूक व्यवस्था अंगिकारावी अशा वाहकांना श्रेणी देण्यात आल्याचे सांगितले. यावर आयुक्त यांनी सूचना केली की, या प्रणालीव्दारे वाहनचालकांची कामगिरी आकारली जावी. कामगिरीनुसार ग्रेडेशन करुन प्रोत्साहन देण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे सुधार करणे योग्य राहील.