नागपूर : ओमिक्रॉन व्हेरिएंटचा समूह संसर्ग तोंडावर असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण हा पसरण्याचा वेग अतिशय जास्त आहे. डेल्टापेक्षा तिपट्टीनं पसरत असल्यानं तज्ज्ञ भीती व्यक्त करत आहेत. 30 पैकी 13 रुग्णांची विदेश पार्श्वभूमी नसल्याची बाब समोर आली. गेल्या चोवीस तासत 441 जण पॉझिटिव्ह सापडलेत.
दुसर्या लाटेचा प्रकोप उच्चांकावर असताना चाचण्यांच्या तुलनेत आठ ते दहा टक्क्यांवर अहवाल सकारात्मक आढळून येत होते. त्यानंतर हळूहळू ही टक्केवारी घटून 0.1 टक्क्यांपर्यंत खाली घसरली होती. परंतु गत काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाने हाहाकार माजविण्यास सुरुवात केली. त्यामुळं कालपरवापर्यंत 0.1 टक्क्यांपर्यंत असणारी दैनंदिन चाचण्यांच्या तुलनेतील बाधितांची टक्केवारी आता सात टक्क्यांपलीकडे पोहोचली आहे. यामुळं प्रशासनाच्याही चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी (ता. 6) जिल्ह्यात झालेल्या एकूण चाचण्यांच्या तुलनेत 7.1 टक्के रुग्णांचे अहवाल सकारात्मक आढळून आले आहेत. तर गुरुवारी ओमिक्रॉनने बाधित आणखी 6 रुग्णांची भर पडली आहे.
बुधवारच्या तुलनेत जिल्ह्यात गुरुवारी चाचण्यांची संख्या घटूनही सकारात्मक अहवालांची टक्केवारी ही वाढल्याचे पहायला मिळाले. बुधवारी जिल्ह्यात 8107 चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी जवळपास 5 टक्के अहवाल सकारात्मक आढळून आले होते. परंतु गुरुवारी शहरात 4619 व ग्रामीणमध्ये 1624 अशा 6243 चाचण्या झाल्यात. त्यापैकी 7.1 टक्के म्हणजेच 441 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आलेत. यामध्ये शहरातील 379, ग्रामीणमधील 39 व जिल्ह्याबाहेरील 23 जणांचा समावेश आहे. गुरुवारी पुन्हा एकाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला नसल्याने प्रशासनही समाधानी आहे. परंतु दिवसभरात शहरातून 19, ग्रामीणमधून 5 व जिल्ह्याबाहेरील 9 असे केवळ 33 जणच ठणठणीत होऊन घरी परतले. सद्यस्थितीत बाधितांचे प्रमाण वाढल्याने सक्रिय रुग्णसंख्येमध्ये प्रचंड मोठी वाढ होऊन ती दीड हजारांच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचली आहे. सद्यस्थितीत शहरात 1266, ग्रामीणमध्ये 160 व जिल्ह्याबाहेरील 58 असे जिल्ह्यात 1484 सक्रिय रुग्ण आहेत.