राज्यासाठी आजचा दिवस घात वार ठरला आहे. राज्यात आज चार ठिकाणी भीषण अपघात झाले. या अपघातात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कुणाची रील बनवण्याच्या नादात अपघात झाल्याने जीव गेला. तर कुणाचा डोळा लागल्याने अपघाती मृत्यू झाला. तर कुणाच्या डोळ्यावर समोरच्या वाहनाच्या लाइटचा प्रकाश पडल्याने अपघात झाला आहे. वसई, नागपूर, चंद्रपूर आणि मनमाड येथे हे अपघात झाले आहेत. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच या सर्व अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
वसईत भाजप शहर मंडळ अध्यघांच्या कार आणि अॅक्टिवाचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. अमित शाहाणी असे मयत तरुणाचे नाव आहे. वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरातील तुळजा माता मंदिरासमोर काल दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली. ज्या गाडीने हा अपघात झाला ती कार भाजपाचे नालासोपारा शहर मंडळ अध्यक्ष प्रकाश पांडे यांची आहे. अपघातावेळी त्यांचा मुलगा तरुण पांडे हा गाडी चालवत होता. त्यांनी जखमी तरुणाला रुग्णालयात देखील नेलं. मात्र त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. माणिकपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास केला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी सांगितलं.
चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी-नागभीड महामार्गावर खरबी-माहेर फाट्यावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर ब्रम्हपुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज पहाटे 4.30 वाजता हा अपघात झाला. नागपूर येथून गडचिरोलीच्या वडसा येथे वऱ्हाडी मंडळी कारनने जात होते. त्यावेळी कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यात दिलीप परसवानी आणि महेश परसवानी यांचा मृत्यू झाला. मृत आणि जखमी एकाच कुटुंबातील असून चालकाला डोळा लागल्याने हा अपघात झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.
नाशिकच्या मनमाड – नांदगाव रोडवर हिसवळ गावाजवळ लग्नाचे वऱ्हाड ट्रकने जात होते. त्यावेळी या भरधाव ट्रकने रस्त्याने जाणाऱ्या 35 ते 40 मेंढ्या चिरडल्या. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला. दरम्यान काही स्थानिकांनी मनमाड पोलिसांशी संपर्क साधला असताना पोलिसांनी पळून जाणाऱ्या ट्रकला अडवलं. ट्रक आणि चालकाला ताब्यात घेतले आहे. नांदगावच्या चंदनपुरी येथुन लग्न समारंभ आटोपून हा ट्रक वऱ्हाड घेऊन ओझरकडे निघाला होता. मात्र रात्रीच्या वेळी समोरच्या वाहनाचा लाईट डोळ्यावर आल्याने अपघात झाल्याचे चालकाने सांगितले. या अपघातात 30 ते 40 मेंढ्या मृत्युमुखी पडून मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नागपूरात अपघाताची मालिका सुरूच आहे. भरधाव कारचं नियंत्रण सुटल्याने सहा बॅरिकेट तोडत ही कार दुभाजकावर आदळली. या अपघातात 2 विद्यार्थी ठार तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाटे 3 वाजता कोराडी पांजरा परिसरात ही घटना घडली. मित्राकडे पार्टी करून रात्री फेर फटका मारण्यासाठी निघालेल्या मित्रांनी कारमध्ये रील बनविण्याचा प्रयत्न केला. या नादात हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात आयुष मधुकर गादे आणि आदित्य पुण्यतवार यांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरु आहेत.
तर नागपूरमधील इतर अपघात कपिलनगर आणि वाठोडा या दोन पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाले. भावेश रवींद्र भरणे हा दुचाकीने जात असताना भरधाव टिप्परने त्याला धडक दिली. त्याला रुग्णलायत नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं. याप्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत तरोडी पूलावर दुचाकी उभी करून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने एका तरुणाला जोरदार धडक दिली. प्रकाश महंत असं या तरुणाचं नाव आहे. जखमी प्रकाश यांना मेयो रुग्णलायत नेले असताना डॉक्टरानी मृत घोषित केले.
तर नागपूरच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक अपघात झाला आहे. अभिषेक पन्नासे हे दुचाकीवरून जात असताना त्यांना भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत पन्नासे यांचा मृत्यू झाला आहे. पन्नासे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.