नागपूर : प्रसव वेदनेने विव्हळत असतानाही, नवसृजनाच्या निर्मितीचा आनंद उपभोगनं, हा कोणत्याही स्त्रीच्या जीवनातील पारलौकिक असाच क्षण असतो. कुही येथील इंदिराबाई हटवार यांनी तर एक-दोन वेळा नव्हे तर सहा वेळा या सृजननिर्मितीचा आनंद उपभोगला. पाच मुले आणि एक मुलगी अश्या सहा अपत्यांना त्यांनी, प्रसव वेदना सहन करुन जगात आणले. मात्र याच अपत्यांनी वयाच्या 80 व्या वर्षी त्यांना कर्करोग झाल्याने वाऱ्यावर सोडून दिले.
अतिशय भयावह स्थितीमध्ये तिची आता मृत्यूसोबत झुंज सुरु आहे. धंतोली येथील जीवनछाया केअर सेंटरमध्ये सध्या तिची सुश्रृषा, तेथील कर्मचारी वर्ग करीत आहे. मात्र ज्यांना तिने जगात आणले, संगोपन केले. त्याच मुलांनी आपल्या जन्मदात्रीला कर्करोग झाल्याने दुर्लक्ष केले, असा आरोप राजेश बावनकुळे या आजीच्या नातवानं केला. मी माझ्या आजीची सेवा करत आहे. म्हणून मामा लोकांनी मलाच शिवीगाळ केल्याची तक्रार राजेशनं कुही पोलिसांत दिली आहे. पण, त्याच्या तक्रारीला पोलिसांनी केराची टोपली दाखविल्यानं राजेशनी पत्रकार परिषद घेतली.
अडीच वर्षांपूर्वी कुही तालुक्यातील पाचगावच्या इंदिराबाई यांना कंबरेला अतिशय घट्ट पातळ नेसत असल्यामुळे घाव झाला. त्यांनी दुर्लक्ष केलं. मग ती जखम चिघळत गेली. कर्करोगाने विळखा घातला. मरेपर्यंत आईचा सांभाळ करील असे लेखी हमीपत्र देणारा तिचा सर्वात लहान मुलगा अंकूश हटवार याने मात्र आईच्या वाट्याची एक एकर शेती घेतली. पण आईच्या वाट्याला आलेले दु:ख दूर करण्याचे कोणतेही प्रयत्न केले नाही.
उलट मुलांनी आईला घराच्या दूर एका खोलीत टाकून देण्यात आले. गेल्या अडीच वर्षांपासून ही आई, कंबरेवरची ही जीवघेणी जखम, त्यातून होणारी महाभयंकर वेदना एकटीने सहन करीत होती. मात्र नंतर तिला नैसर्गिक विधीसाठी देखील उठता येत नव्हते. जिने मायेच्या ओलाव्याने या पुत्राचे मल-मूत्र साफ केले. त्याला ओल्यातून कोरड्यात झोपवले. त्याने आपल्या आईला औषधोपचारही केले नाही. ती जखम कर्करोगात परिवर्तित होत गेली. आता त्या सहा अपत्यांच्या जन्मदात्रीकडे जगण्यासाठी नव्हे, तर या वेदनेतून सुटण्यासाठी, अवघे काहीच दिवस शिल्लक असल्याचे जीवनछाया केअर सेंटरमधील तज्ज्ञ सांगतात.