नागपूर : विधान परिषद निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहेत. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, तर महाविकास आघाडीकडून छोटू भोयर हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आपली मते फुटू नयेत, यासाठी भाजपतर्फे नगरसेवकांच्या पर्यटनाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळं बहुतेक नगरसेवक हे सहलीच्या नियोजनात आहेत. त्यामुळं त्यांना फोन उचलायलादेखील वेळ नाही. काही नगरसेवकांनी तर आपले मोबाईल स्वीच ऑफ करून ठेवले आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्याकडं कुणाचंही लक्ष नाही.
नरसाळा येथील गौतमनगरात वर्षभरापूर्वी ग्रीन जिम लावण्यात आले. दोन महिन्यांपूर्वीच ते ग्रीन जीम उखळले. गौरव फेब्रीकेशनच्या कंत्राटदाराकडं हे काम होतं. देखभालीचा कालावधी पाच वर्षे असं बोर्डावर लिहिण्यात आले आहे. त्यामुळं त्यांना फोन केला असता त्यांनी मटेरियन स्थानिकांना खरेदी करायला लावले. ते त्यांनी खरेदी केलं आहे. फक्त त्यांना त्यांच्या माणसाकडून ते ग्रीन जिम पुन्हा लावून द्यायचे आहेत. त्यासाठी ते टाळाटाळ करीत असल्याचं दिसून येते. त्यानंतर स्थानिकांनी आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
ग्रीन जीम लावण्यात यावे, यासाठी गौतमनगरातले नागरिक नगरसेविका विद्या मडावी यांच्याकडे गेले असता वारंवार तेच काम करायचं काय? असा त्यांचा प्रश्न आहे. खर तर स्थानिक रहिवासी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांना पर्यटनाची घाई होती. बाहेरगावी जायच्या तयारीत होत्या. त्यामुळं त्यांना लोकांच्या समस्या एेकूण घेण्यात काही रस नव्हता. विद्या मडावी यांचे पती योगेश मडावी हे नरसाळाचे भाजपचे प्रमुख आहेत. त्यांनी तर मोबाईलच बंद करून ठेवला आहे. अशीच काहीसी परिस्थिती बहुतेक नगरसेवकांची आहे. त्यामुळे स्थानिकांच्या समस्या वाऱ्यावर आहेत. भाजप नगरसेवकांना गोवा, कर्नाटक, महाबळेश्वरला पाठविण्यात येणार आहे. लेह, लडाखला नगरसेवकांची पसंती होती. परंतु, विमानाचे बुकिंग फुल्ल असल्यानं त्यांची अडचण झाली. पहिला जत्था रविवारी निघणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर आणखी वेगवेगळ्या ठिकाणी नगरसेवकांना घेऊन जाण्यात येणार आहे. त्यासाठी नगरसेवक तयारीला लागल्याचं चित्र आहे.
ग्रीन जिमचे कंत्राटदार गौरव फेब्रिकेशनच्या कंत्राटदाराला फोन केला असता दुरुस्ती करायची असेल, तर आता होणार नाही, असं सांगितलं. यासाठी आचारसंहितेच कारण पुढं केलं गेलं. पाच वर्षे देखभाल दुरुस्ती करू, असा बोर्ड लावण्यात आला आहे. तरीही कंत्राटदार दुरुस्तीसाठी आचारसंहितेच कारण पुढं करत आहे. अशा कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.