स्वप्नील उमप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नाशिक | 2 मार्च 2023 : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आजीमाजी खासदारांनी मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे युती आणि आघाडीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातही काही वेगळं चित्र नाही. नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. तर, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ हे माजी खासदार आहेत. अडसूळ यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी करतानाच शिंदे गटाने भाजपवर दबावही वाढवला आहे. त्यामुळे भाजप शिंदे गटाच्या बाजूने कौल देणार की काय? अशी स्थिती निर्माण झालेली असतानाच नवनीत राणा या नवा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याने अमरावतीच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत.
नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. त्या अपक्ष खासदार आहेत. त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. पण त्या भाजपमध्ये गेलेल्या नाहीत. त्यामुळे शिंदे गटाने अमरावतीच्या जागेवर दावा केला आहे. पूर्वी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावतीचे खासदार होते. भाजपची ही जागा नव्हती. त्यामुळे शिंदे गटाने या जागेवर दावा ठोकला आहे. तर ही आमची जागा आहे असं भाजपही म्हणू शकत नाही. त्यामुळे नवनीत राणा यांचं काय होणार? अशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता नवनीत राणा या नवा डाव टाकण्याची तयारी आहे.
नवनीत राणा या भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भाजपमध्ये जाऊन शिंदे गटाची पर्यायाने आनंदराव अडसूळ यांची कोंडी करण्याची नवनीत राणा यांची खेळी असल्याचं बोललं जात आहे. रवी राणा यांच्या विधानातून तसे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्यावर नवनीत राणा मोठा निर्णय घेऊ शकतात असं सांगितलं जात आहे. तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार का? असा सवाल रवी राणा यांना करण्यात आला.
त्यावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अजून चर्चा झाली नाही. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग्य वेळी करेक्ट सिग्नल येईल तेव्हा सकारात्मक निर्णय कसा घ्यायचा त्यावर आम्ही विचार करू. सध्या महायुतीचे घटक म्हणून ताकदीने काम करू, असं सूचक विधान रवी राणा यांनी केलंय. नागपुरात जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या युवक संमेलनाला खासदार नवनीत राणा उपस्थित राहतील आणि मार्गदर्शन करतील. युवा स्वाभिमान पार्टीचे हजारो कार्यकर्ते त्या कार्यक्रमाला हजेरी लावतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो की मग अडसूळ पिता-पूत्र असो हे येत्या निवडणुकीत खासदार नवनीत राणा यांचा प्रचार करतील ही काळ्या दगडावरील रेष आहे. आनंदराव अडसूळ दोन वेळा अमरावतीमधून खासदार होते. आता त्यांचं वय झालं आहे. निवडणुकीमध्ये नवनीत राणांच्या विजयासाठी कसं काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन ते कार्यकर्त्यांना करतील. आजपर्यंत मी जे जे बोललो ते ते खरं झालं आहे, असं सूचक विधान रवी राणा यांनी केलं आहे.
दरम्यान, अमरावतीत राणा समर्थकांच्या फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यावरून नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तुम्ही बांधाल तेच आमचे तोरण, तुम्ही ठरवाल तेच आमचे धोरण, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण आम्ही फक्त राणा समर्थक आहोत, अशी नवनीत राणा समर्थकांनी पोस्ट व्हायरल केली आहे. ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून त्यामुळेही राणा दाम्पत्याच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत.