नागपूर : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी AU चा मुद्दा पुढे केल्यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येचं प्रकरण उकरुन काढलंय. दिशा सालियन प्रकरणात एसआयटी चौकशी केली जात असेल तर बिल्डर सूरज परमार यांच्या प्रकरणातही एसआयटी चौकशी केली जावी, अशी मागणी अरविंद सावंत यांनी केलीय. अरविंद सावंत यांनी उल्लेख केलेलं सूरज परमार यांचं प्रकरण काय आहे. तेही समजून घेऊयात.
ठाण्यातले बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी 2015 साली स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. परमार यांनी लिहिलेली सोळा पानी सुसाईड नोट पोलिसांना आढळली होती.
ठाण्यात झालेल्या या घटनेनंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले होते. सूरज परमार यांच्या डायरीत काही सांकेतिक नावं असल्याचंही समोर आलं होतं.
आपल्याला त्रास देणाऱ्या सहा राजकीय व्यक्तींची नावं परमार यांनी चिठ्ठीत लिहिली होती. पण ही नावं त्यांनी खोडली होती. ही नावं वाचली गेली तर आपल्या कुटुंबाला त्रास दिला जाईल असं त्यांनी म्हटलं होतं.
परमार यांच्या सुसाईड नोटमध्ये चार नगरसेवकांचीही नावं होती. परमार यांच्या याच सुसाईड नोटमध्ये ES नावाच्या एका राजकीय नेत्याचाही उल्लेख असल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केलाय.
संजय राऊत यांनीही या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केलीय. ठाकरे गटानं परमार प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केलीय. पण त्याआधी ज्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी लावण्यात आली ते प्रकरण काय आहे. तेही समजून घेऊयात.
दिशा सालियान ही अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर होती. सुशांतसिह राजपूत वांद्रेत तर दिशा सालियान मालाडमध्ये राहायची. 8 जून 2020 ला दिशा सालियानचा इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला. त्याच्या बरोब्बर 6 दिवसांनी म्हणजे 14 जून 2020 ला सुशांतसिंह राजपूतचाही मृत्यू झाला. त्यामुळे या दोन्ही मृत्यूंमध्ये काहीतरी संबंध असल्याचा संशय वर्तवला जातोय.
दिशाचा मृत्यू हा अपघाती नसून ती हत्याच असल्याचा दावा राणे कुटुबियांनी केलाय. तर शेवाळेंनीही सुशांतसिंह राजपूतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला AU या नावानं 44 कॉल्स आल्याचा दावा केलाय.
AU म्हणजे कोण याचं स्पष्टीकरण खुद्द रिया चक्रवर्तीनं माध्यमांशी बोलताना दिलं होतं. रिया चक्रवर्तीनं दिलेल्या या स्पष्टीकरणानंतरही सत्ताधाऱ्यांनी AU कोण याची चौकशी करण्याची मागणी केलीय.
त्यानंतर आता विरोधकांनी ES हे प्रकरण बाहेर काढलंय.
सूरज परमार आत्महत्या प्रकरणात विरोधी पक्षाच्या नेत्यांचा रोख राज्य सरकारमधल्या एका मोठ्या मंत्र्याकडं आहे. याआधीही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी एनआयटी भूखंड घोटाळ्याचे आरोप केले होते.
आता ठाण्यातल्या बिल्डरच्या आत्महत्या प्रकरणातही सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरु झालाय. AU विरुद्ध ES ही लढाई आता विधीमंडळातही वादळी ठरण्याची शक्यता आहे.