नागपूर: नाशिक पदवीधर मतदारसंघातली उमेदवार शुभांगी पाटील यांचा नंबर नॉट रिचेबल येत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजलेली आहे. ही घटना ताजी असतानाच दुसरी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूर आणि शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे दोन उमेदवार नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आहे. नागपूरचे उमेदवार सतिश इटकेलवार आणि औरंगाबादचे प्रदीप साळुंखे हे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचं वृत्त आल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार सतिश इटकेलवार हे उभे होते. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, त्यांचा नंबरही सकाळपासून नॉटरिचेबल येत असल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. इटकेलवार नेमके कुठे गेले? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास उरले आहेत. त्यापूर्वीच इटकेलवार गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रदीप साळुंखे हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. ते कुणासोबत आहेत? कुठे आहेत? याचा काहीच थांगपत्ता लागताना दिसत नाहीये. त्यामुळे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत.
हे दोन्ही उमेदवार अर्ज मागे घेण्यापूर्वीच समोर येणार की अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर समोर येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विरोधकांचे उमेदवार फोडण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवलं तर नाही ना? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, नाशिक पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवार शुभांगी पाटील या सुद्धा कालपासूनच नॉट रिचेबल आहेत. त्यांचाही फोन लागत नाहीत. त्या कुणासोबत आहेत त्याचीही माहिती मिळत नाही. विशेष म्हणजे मंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. अपक्षांनी माघार घ्यावी आणि सत्यजित तांबे यांचा विजय सोपा व्हावा या प्रयत्नात ते आहेत.
असं असताना शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच नाशिकमधील अपक्ष उमेदवार धनराज विसपुते यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून ते उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.