नागपूर : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दिल्लीवरून निघाले आहेत. पावणेएक वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते रॅली काढणार होते. पण, पोलिसांनी त्यांच्या रॅलीला परवानगी नाकारली. राणा दाम्पत्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी बॅनर्स (Banners), पोस्टर्स लावण्यात आले होते. पण, नागपूर मनपाच्या पथकानं हे पोस्टर्स, बॅनर्स काढले. रवी राणा व नवनीत राणा याचे नागपूर शहरात लावलेले फलक नागपूर महापालिकाच्या पथकाकडून काढण्यात येत आहेत. बजाजनगर (Bajajnagar) चौक ते लोकमत चौकापर्यंत हे बॅनर्स लावण्यात आले होते. या बॅनर्सवर हनुमान चालिसा म्हणणे राजद्रोह आहे का, याचा जाब विचारण्यात आलाय. शिवाय रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आमंत्रित करण्यात आलंय. तिकडं, राष्ट्रवादीही राणा दाम्पत्यांविरोधात आक्रमक झालीय. त्यामुळं कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडू नये, यासाठी प्रशासन (Administration) कामाला लागलंय.
नागपुरात आज एकीकडे राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठण करणार आहेत. तर दुसरीकडं राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा हनुमान चालिसा पठण करणार आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बाजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार आम्ही शांततेत आमचा कार्यक्रम करणार आहोत. त्यांना होर्डिंग लावायचे होते त्यांनी लावले. आम्हाला त्यानं काही फरक पडणार नाही, असं राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार सांगतात.
महागाई जगू देईना आणि केंद्र सरकार भिक मागू देईना. नागपुरात राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अशाप्रकारचे होर्डिंग लावण्यात आलेत. देशातील महागाई जावी म्हणून आज नागपुरातील रामनगर हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण आहे. याच मंदिरात राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळं नागपूरच्या रामनगरमधील हनुमान मंदिराच्या समोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. 12.30 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यानंतर याच मंदिरात राणा दाम्पत्य सुद्धा करणार हनुमान चालिसा पठण करणार आहेत.