नागपूर : शहरात हुडहुडी भरायला लावणारी थंडी आहे. आज पहाटे नागपूरचे तापमान 7.6 अंशावर पोहचले आहे. माणसाप्रमाणं देवालाही थंडी लागते. नागपूरच्या प्रतापनगरमधील गणेश मंदिरात ही परिस्थिती पाहायला मिळते. गणपती बाप्पांना शॉल ओढण्यात आली आहे. त्यांना गरम कपडे घालण्यात आले आहेत. माणसाला थंडी लागते मग देवाला थंडी का लागत नसावी?, असा प्रश्न तिथल्या विश्वस्तांना पडला आणि त्यांनी देवासाठी उनीच्या कपड्यांची व्यवस्था केली.
नागपूरसह संपूर्ण विदर्भ सध्या थंडीनं गारठलाय. नागपुरात तर पारा 7.6 अंशापर्यंत खाली आलाय. त्यामुळं या थंडीचा सर्वसामान्य माणसाला त्रास होतोय. तसाच देवांनाही होतोय या भावनेतून शहराच्या तात्या टोपेनगर गणपती मंदिरातील गणपती मूर्तीला शॉल पांघरण्यात आलीय. लोकरीचा टोप घालण्यात आलाय. गाभाऱ्यात ऊब राहावी यासाठी दिवे तेवत ठेवले आले आहेत.
गिरीश देशमुख हे या मंदिराचे विश्वस्त आहेत. ते सांगतात, गणपतीची स्थापना करतो तेव्हा एक प्राणप्रतिष्ठा सोहळा करतो. याचा अर्थ गणपतीच्या मूर्तीमध्ये खऱ्या अर्थानं प्राण फुंकतो. म्हणून ती मूर्ती खऱ्या अर्थानं जीवंत राहते. त्यानंतर बाप्पाशी आपण हितगूज करतो. नमस्कार करतो. माणसाला थंडी वाटते. तशी देवालाही थंडी लागते. म्हणून बाप्पाला शाल पांघरून देण्यात आली आहे. थंडीच्या दिवसांत बाप्पाला शाल, टोपी घालून देतो. मूर्तीचे कान, नाक बांधून फक्त डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. गाभाऱ्यात उब राहावी म्हणून हिटर लावण्यात आला. तसेच तेलाचे दिवे सतत ठेवले जातात. एकंदरित गाभाऱ्यातील तापमान कमी होऊ नये, यासाठी प्रयत्न केला जातो, असं मत गिरीश देशमुख यांनी व्यक्त केलंय.
या हंगामातील नागपुरात सर्वात कमी तापमानाची नोंद आज झाली. काल तापमान 7.8 होता. गेल्या 24 तासात 0.2 डिग्री तापमान घसरले. विदर्भातील तापमान :- अकोला 11, अमरावती 7.7, बुलडाणा 11.2, चंद्रपूर 9.6, गडचिरोली 7.4, गोंदिया 8.4, नागपूर 7.6, वर्धा 8.2, यवतमाळ 9 अशाप्रकारे कमीत-कमी तापमान आहे. येत्या चार दिवसात आणखी तापमान कमी होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे विदर्भात थंडीची लाट आली आहे.