नागपूर : विदर्भातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदेच्या जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली. थंडी असल्यानं सकाळी मतदान मतदानासाठी फारसे उत्सुक दिसले नाहीत. 11 वाजतानंतर मतदान मतदानासाठी घराबाहेर पडतील, असे चित्र आहे. शिवाय विदर्भातील 38 नगर पंचायतीच्या जागांसाठीही आज सायंकाळी साडेपाच वाजतापर्यंत मतदान होत आहे.
भंडारा जिल्हा परिषदेच्या 5 जागांपैकी 39 जागांसाठी 345 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर गोंदिया जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी 43 जागांसाठी 243 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. तसेच 38 नगरपंचायतीच्या 541 जागांसाठी 2332 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मशीनमध्ये बंद होणार आहे.
गडचिरोलीत सर्वाधिक 9 नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. 554 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ओबीसी जागा वगळता ही निवडणूक होत आहे. ओबीसी जागांवरील आरक्षण संपुष्ठात आले आहे. आता 18 जानेवारी 2022 रोजी तेथे खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक होणार आहे. त्यामुळं 21 डिसेंबरला पहिला टप्पा तर 18 जानेवारीचा दुसरा टप्पा राहील. 19 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.
अमरावती जिल्ह्यात दोन नगरपंचायतीच्या 30 जागांसाठी 122 उमेदवार रिंगणार आहेत. भंडाऱ्यात तीन नगरपंचायतीच्या 39 जागांसाठी 167 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या 82 जागांसाठी 330 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गोंदिया जिल्ह्यात तीन नगरपंचायतीच्या 45 जागांसाठी 197 उमेदवार उभे राहणार आहेत. नागपूर जिल्ह्यात दोन नगरपंचायतीच्या 26 जागांसाठी 99 उमेदवार आपले भाग्य आजमावत आहेत. वर्धा जिल्ह्यात चार नगरपंचायतीच्या 54 जासांसाठी 233 उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात सहा नगरपंचायतीच्या 84 जागांसाठी 475 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. बुलडाणा दोन नगरपंचायतीच्या 26 जागांसाठी 95 उमेदवार रिंगणार आहेत. वाशीम जिल्ह्यात एका नगरपंचायतीच्या 13 जागांसाठी 59 उमेदवार निवडणुकीत आपले भाग्य आजमावत आहेत. या सर्व जागांसाठी मतदान सुरू आहे.
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 39 जागांसाठी मतदान होत आहे. गोंदियात जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 43 जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरुद्ध राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल असा सामना आहे. नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. दोन्ही जिल्ह्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीत तिरंगी लढतीचे चित्र आहे.