नियंत्रण सुटलेला ट्रक महिंद्रा कॅम्परवर आदळला; अभियंत्यासहीत तिघांचा जागीच मृत्यू

| Updated on: Aug 07, 2023 | 7:01 AM

या सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या खाणी उंच डोंगरावर आहे. तिथून लोह खनिजाचा कच्चा माल खाली आणण्यात येतो. तिथून सदर कच्चामाल चंद्रपूरात नेण्यात येतो.

नियंत्रण सुटलेला ट्रक महिंद्रा कॅम्परवर आदळला; अभियंत्यासहीत तिघांचा जागीच मृत्यू
accident
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मोहम्मद इरफान, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, गडचिरोली | 7 ऑगस्ट 2023 : गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज प्रकल्पात एक भीषण अपघात झाला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी नियंत्रण सुटलेला ट्रक महिंद्रा कॅम्परवर जोरदार आदळला. त्यामुळे या महिंद्रा कॅम्परमधील पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. या तिघांपैकी एकजण इंजिनीअर आहे. दोन्ही जखमी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे सुरजागडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापली तालुक्यात सुरजागड लह खनिज प्रकल्पातील लँड मेटल कंपनीत ही घटना घडली. काल सायंकाळी कामावरून परत येत असताना कच्चा माल वाहून नेणाऱ्या ट्रकचं ब्रेक फेल झालं. त्यामुळे ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं. हा ट्रक समोरून येणाऱ्या महिंद्रा कॅम्परवर आदळला. त्यात महिंद्रा कॅम्परमध्ये असलेल्या पाच जणांपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

मृतांमध्ये हरियाणातील दोन मजुरांचा समावेश आहे. तसेच अहेरी तालुक्यातील अभियंते सोनल रामगिरीवर यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातातील दोन गंभीर जखमींना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण या दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

आधी दुचाकीस्वाराचा मृत्यू

या सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या खाणी उंच डोंगरावर आहे. तिथून लोह खनिजाचा कच्चा माल खाली आणण्यात येतो. तिथून सदर कच्चामाल चंद्रपूरात नेण्यात येतो. या कच्च्या मालाच्या वाहनांमुळे अनेक अपघात या कालावधीत होत असतात. आज लगाम बोरी परिसरात कच्चा माल वाहून नेणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर संध्याकाळी हा भीषण अपघात झाला.

अपघातानंतर तणाव

काल सायंकाळच्या वेळी लँड मेटल कंपनीच्या खाणीत ही घटना घडली. या अपघातानंतर लॅयड मेटल कंपनी परिसरात तणाव निर्माण झाला होता. मजुरांनी आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे या पोलिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

वाहनांमुळे रस्ता खराब

एटापल्ली ते आलापल्ली आणि आलापल्ली ते आष्टी हा मार्ग या कच्च्या मालाच्या वाहतुकीमुळे खराब झाला आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच अपघात होत असतात. सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या वाहनांमुळे या मार्गावर अनेकांचे जीव गेलेले आहेत.

त्याविरोधात अनेक आंदोलन करून देखील जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या उदासिनतेमुळेच अपघात होऊन तीन जणांचा मृत्यू झाला, असा आरोप करत मजुरांनी निदर्शने केली होती.