गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 16 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करण्याची जोरदार मागणी केली आहे. ओबीसी म्हणून आरक्षण दिल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ओबीसी समाजात खळबळ उडाली आहे. ओबीसींमध्ये मराठा समाज आल्यास आरक्षणाचा टक्का कमी होणार असल्याची भीती ओबीसींना आहे. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी जरांगे पाटील यांची मागणी फेटाळून लावली आहे. काही नेत्यांनी तर आम्ही जरांगे पाटील यांच्यापेक्षा पाचपट सभा घेऊन मराठ्यांच्या ओबीसीतील समावेशाला विरोध करू असा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि भाजपचे ओबीसी सेलही कामाला लागले आहेत. या दोन्ही सेलची आज बैठक होणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ओबीसी नेते अस्वस्थ झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी ही ओबीसी संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला ओबीसींच्या 40 संघटना उपस्थित राहणार आहेत. नागपूरात रवी भवन येथे आज सकाळी 11.30 वाजता ही बैठक होणार आहे.
या बैठकीत ओबीसी आंदोलनाची पुढील रुपरेषा ठरवण्यात येणार आहे. बैठकीत राज्यभरातील प्रमुख ओबीसी संघटनांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. ओबीसींचा भव्य मोर्चा काढण्यावरही बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेश सेलने ओबीसींची तातडीची बैठक बोलावली आहे. तडकाफडकी ही बैठक बोलावली आहे. मुंबईत ही बैठक होत आहे. जरांगे पाटील यांच्या अल्टिमेटला फक्त आठ दिवस उरले आहेत. त्यामुळे सरकारवर दबाव आणण्यासाठी या बैठकांचं आयोजन करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
भाजपच्या ओबीसी सेलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ओबीसींचा महाकुंभ घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. डिसेंबर महिन्यात लोकसभा निवडणुक लागण्यापूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत ओबीसी महाकुंभ म्हणून मोठी सभा घेण्याचं भाजपचं नियोजन आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात राज्यात ओबीसी जागर यात्रा सुरू आहे. या यात्रेचा समारोप ओबीसी महाकुंभ घेऊन करण्याचं भाजपमध्ये घटत आहे. त्यासाठी आज भाजपच्या ओबीसी सेलने मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या वसंत स्मृती येथे ही बैठक होत आहे. भाजपच्या ओबीसी सेलच्या आज होणाऱ्या बैठकीला भाजपचे ओबीसी सेलचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारची विश्वकर्मा योजना राज्यात राबवण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे. केंद्र सरकारने ओबीसींसाठी तयार केलेल्या योजनेचे महाराष्ट्रातील लाभार्थी वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळे हे आजच्या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष संजय गाथे, डॅा. आशिष देशमुख, अशोक जीवतोडोंसह भाजपचे अनेक ओबीसी नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या बैठकीत ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या मागणीवरही चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.