भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिवाळी निमित्त कुटुंबियांसह फटाके खरेदी केले. बावनकुळे मुलगा संकेत, सून अनुष्का, मुलगी पायल, जावई लोकेश, नात काव्या, नातू अधिराज यांच्यासोबत फटाके खरेदी करायला आले आणि त्यांनी भरभरून फटाके खरेदी केले. यावेळी त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “माझ्या आवडीचा फटाका रॅाकेट आहे. भाजप 23 तारखेला रॅाकेट उडवणार. प्रचारातून चार तास वेळ काढून मी नातवंडांसोबत फटाके खरेदी करायला आलोय. महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास ठेवला पाहिजे, जनता पुढील पाच वर्षे महायुतीचं सरकार येणार. हाच राजकीय बॅाम्ब फुटणार. भाजपचं रॅाकेट खूप उडणार आणि विकास करणार. 23 तारखेला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी बॅाम्ब फोडणार. हा बॅाम्ब विकासाचा असेल”, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “हिंदू संस्कृतीचे सण परिवारासोबत साजरे करायला हवेत. भाजप, महायुतीचं रॅाकेट खूप उडणार आहे. महायुतीचं रॅाकेट राज्याचा विकास करेल. माझ्या आवडीचा फटाका रॅाकेट आहे. भाजपचं रॅाकेट खूप वर जाणार आहे”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलीची ही पहिली दिवाळी आहे. आणि साहेब वेळ देतात. आम्ही सोबत फटाके फोडणार. परिवार एकत्र राहणार”, असं संकेत बावनकुळे म्हणाले. यावेळी बावनकुळे यांच्या सून अनुष्का यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. “माझी मुलगी काव्या आणि भाचा अविराज यांची पहिली दिवाळी आहे. त्यांना फटाके खरेदी करुन देतोय. साहेब दिवाळीला सोबत असतात”, असं अनुष्का म्हणाल्या. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कन्या पायल आष्टनकर यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलाला फटाके फोडायला आवडतात. त्याला फटाके खरेदी करतोय. साहेब प्रत्येक सण आमच्यासोबत साजरा करतात”, असं पायल आष्टनकर म्हणाल्या.
विधानसभा निवडणुकीत भाजपातील नेते, कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या बंडखोरीवरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रातील आमचं युनीट बंडखोरी केलेल्या पदाधिकाऱ्यांना समजावत आहे. अर्ज मागे न घेणाऱ्यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल. भाजपचे उमेदवार, उमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारा विरोधात कार्यकर्ता उभा राहीला आणि अर्ज मागे घेतला नाही तर त्याला आम्ही पक्षातून काढून टाकू”, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. “बंडखोरी केलेल्या सर्व कार्यकर्त्यांशी आमचा संपर्क झालाय. कालपर्यंत, उद्यापर्यंत, 4 तारखेपर्यंत तीन वाजेपर्यंत आम्ही अर्ज मागे घ्यायला सांगितलं आहे. नाही अर्ज मागे घेतला तर विस्ताराचे करु”, असं बावनकुळे म्हणाले.