सुनील ढगे, Tv9 मराठी, नागपूर | 29 जानेवारी 2024 : महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडून आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर वर्षभरानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला. त्यामुळे सत्ताधारी मंत्र्यांकडे असणारी खाती काढून घेण्यात आली. या मंत्र्यांना त्याऐवजी दुसऱ्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली. पण याच निर्णयावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गिरीश महाजन यांची भाजपचे संकटमोचक अशी ख्याती आहे. पक्ष पक्षाचे संकटमोचक नाराज असल्याचं समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. गिरीश महाजन यांच्या नाराजीवर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील लगेच प्रतिक्रिया देत त्यांना आश्वस्त केलं आहे. नागपुरात आज खासदार औद्योगिक महोत्सव समापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.
“इतक्या मोठ्या नावाजलेल्या कंपन्या नागपुरातील आहेत हे मलाही माहिती नव्हतं. पर्यटनाला इंडस्ट्री म्हणून बघितलं पाहिजे. पूर्वी राज्यांमध्ये आपण दोन नंबरवर होतो. आता नऊव्या, दहाव्या नंबरवर आहोत. आपल्यापुढे काश्मीर, केरळ, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश पुढे जात आहेत. विदर्भात फॉरेस्ट आहे. अनेक पर्यटनस्थळ आहेत. तरीसुद्धा आपण मागे आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. माझ्याकडे 3 सेक्रेटरी बदललेले आहेत. त्यामुळे कसं काम करावं हे मला कळत नाही. तीन वर्षात तिसऱ्यांदा मंत्री झाले आहे. अडचणी भरपूर आहेत. अजून सात-आठ महिने हे खातं माझाकडे ठेवलं तर मला काहीतरी करता येईल, असं मला वाटतं”, असं म्हणत गिरीश महाजन यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली.
गिरीश महाजन एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुढे आणखी मोठं वक्तव्य केलं. “आमच्याकडे मित्र वाढले, पार्टनर वाढले की मग खाते बदलतात. त्यांच्या डिमांडप्रमाणे खातं बदलतात. त्यामुळे ती मोठी अडचण झालेली आहे. मला असं वाटतं की इकोनॉमी नाही रोजगार देणारी संस्था म्हणून पर्यटन विभागाकडे बघितलं तर अधिक त्याला बळकटी देता येणार आहे”, असं गिरीश महाजन म्हणाले.
“गिरीश भाऊ तुम्ही चिंता करू नका. पुढच्या काळात तुमच्या खानदेशामध्ये सुद्धा हा कार्यक्रम नितीनजी करतील. तुम्ही जे सांगितलं, पर्यटन मंत्र्यांचा पर्यटन रोका, तेही आम्ही रोखलेला आहे. त्यामुळे आता तुम्हीच कायमस्वरुपी पर्यटन मंत्री आहात. त्यामुळे तुम्हाला उत्तर महाराष्ट्रात, विदर्भात जिथे वाटते तिथे पर्यटन वाढवा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. नितीनजींनी तुम्हाला पर्यटनाच्या संदर्भातला संधी उपलब्ध करून दिल्या आहेत”, असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांना दिलं.