भाजपचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मननोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे त्यांनी एक महत्त्वाच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिलं. “पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात कोणताही वाद नाही. विरोधकांकडून आमच्यात वाद असल्याचा प्रचार केला जातो. उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत माझे खूप चांगले संबंध आहेत”, असं नितीन गडकरी यावेळी म्हणाले.”मोदी आणि आमच्यात कुठलाही वाद नाही. काही पत्रकार मोदींवर थेट टीका करायला घाबरतात, ते माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून लिहितात. कुणीतरी एक चुकीचं लिहितो, त्यानंतर तुम्ही सगळे लोक उचलून त्याच्या स्टोऱ्या करतात. मोदींचा आणि माझा उत्तम संवाद आहे. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. कारण नसताना आधारहीन बातम्यांचा मनस्ताप होतो”, असं नितीन गडकरी म्हणाले.
“पत्रकारांनी काय लिहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मीडियामधील पत्रकारांचा एक गट हा सातत्याने मोदी आणि माझ्यामध्ये अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. मी अल्टरनेटीव्ह आहे, पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे, मला लोकांचा पाठिंबा आहे, असं माझ्या चांगल्या भावनेने लिहण्यापेक्षा या अशा सातत्याने थेऱ्या चालवतात. पण यात काही तथ्य नाही”, असा खुलासा नितीन गडकरी यांनी केला.
प्रकाश आंबेडकर यांनी नितीन गडकरी यांच्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. भाजप पक्ष 200 पेक्षा कमी जागांवर विजय झाला तर नितीन गडकरी हे पंतप्रधान असतील, असं वक्तव्य आंबेडकरांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याबाबत नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “आम्हाला या निवडणुकीत बहुमत मिळणार आहे. मोदीजीच देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे दुसरे कोणाच्या होण्याचा विषय होत नाही. माझ्या डोक्यातही तसा विषय नाही. आम्हाला 400 पार जागा मिळतील आणि मोदीजी देशाचे पंतप्रधान होतील”, असं नितीन गडकरी म्हणाले.
नितीन गडकरी यांना भाजप पक्षात साईडलाईन केलं गेलंय, असं वक्तव्य ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याबाबत नितीन गडकरी यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ठाकरेंचा दाव्याचं खंडन केलं. “मला कुणी साईडलाईन केलं नाही. कुणी हे करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. मंत्री हा माजी मंत्री बनतो, खासदार माजी खासदार बनतो. आमदार माजी आमदार बनतो. पण कार्यकर्ता कधी माजी खासदार बनत नाही. भाजप आणि विचारधारा आणि संघाचं स्वयंसेवकत्व हे माझ्या आयुष्याचं एक भाग आहे. त्यामुळे असं कुठेच नाही. मी मंत्री आहे. मी सरकारमध्ये आहे तर सरकारचं काम करतोय. उद्या पक्षात काही काम असेल तर पक्षाचं काम करतो”, अशी प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी दिली.
“मी नेहमी अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितलेली गोष्ट लक्षात ठेवतो. मतभिन्नता असू द्यावी, मतभेद असावेत. पण मनभेद नसावेत. युती, आघाडी होते, जाते, लोक इकडून तिकडे जातात. व्यक्तीगत संबंध वेगळे ठेवावेत आणि राजकारण वेगळे ठेवावेत. सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणे हे लोकशाहीला मजबूत ठेवण्याची प्रक्रिया असते”, असं नितीन गडकरी म्हणाले.