नागपूरमध्ये सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांच्या आयोजित कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. नागपुरात श्याम मानव यांचा संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कार्यक्रम सुरु असताना एकाने प्रश्न विचारला. त्यानंतर गोंधळ झाला. यावेळी काही जण व्यासपीठावर आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच गोंधळ घालण्यात आला. श्याम मानव यांचं संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव या विषयावर व्याख्यान सुरु होण्याआधी इतर वक्तव्याचं भाषण सुरु होतं. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारला आणि त्यानंतर कार्यक्रमात गोंधळ उडाल्याची माहिती आहे. श्याम मानव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा आहे.
यावेळी आंदोलकांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. “अंधश्रद्धा निर्मूलन समिती संविधानाचा आधार घेऊन जर असं समाजात भेदभाव करत असेल आणि देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत असेल तर ते कुणाचे समर्थक आहेत याचं त्यांनी उत्तर द्यावं. ह्यांनी कुणाचा ठोका घेतलेला आहे?”, असा सवाल भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. “आम्हाला फक्त एवढं विचारायचं आहे की, ते संविधान बदलवतात म्हणतात, त्यांनी स्पष्ट सांगावं की, २०१४ नंतर संविधानात असे कोणते बदल झालेले आहेत? हे प्रश्न विचारणारे कुठल्या पक्षाचे आहेत ते त्यांनी स्पष्ट करावं. आम्ही साधा प्रश्न विचारला की, २०१४ पासून संविधानात काय बदल झाला?”, असा सवाल भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली.
“ज्या काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात उमेदवार उभा केला त्या काँग्रेसचं समर्थन हे लोकं करत आहेत. ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा वारंवार अपमान केला त्या काँग्रेसचं हे लोकं समर्थन करतात?”, असा सवाल आंदोलकांनी केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. दरम्यान, श्याम मानव यांचं भाषण अद्याप सुरुच होणार होतं. त्याआधी प्रश्न विचारल्यानंतर गोंधळ झाला.
या घटनेवर श्याम मानव यांनी प्रतिक्रिया दिली. “ज्या नागपूरमध्ये वेगवेगळ्या विचारधारेचे लोकं एकत्र राहतात, जाहीरपणे एका कार्यक्रमात येऊन वेगवेगळी मते मांडतात, त्या नागपुरातूनच हे संविधान संपत असल्याची परिस्थिती झाली आहे. मला अशा घटनांची सवय आहे. मला काहीही झालेलं नाही. मी सुरक्षित आहे”, असं श्याम मानव यांनी सांगितलं.
“विषय तसाच आहे, संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव. आमचा वक्ता बोलत असताना मध्येच गोंधळ घालणं म्हणजे ही फक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नाही तर लोकशाहीवरची गदा आहे. आचारसंहिता घोषित झाल्यानंतर हे अशाप्रकारे वागत असतील तर हे किती संविधान वाचवणारे आणि लोकशाही बुडवणारे लोकं आहेत, याचा उत्कृष्ट पुरावा ते लोकांसमोर देत आहेत. संविधान बचाव आणि महाराष्ट्र बचाव हाच विषय आहे आणि याचा पुरावा त्यांनी दिलेला आहे”, अशी टीका श्याम मानव यांनी केली.