गजानन उमाटे, नागपूर : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात पाच जणांना चांगली अद्दल घडली. गुप्तधनाची लालसा करणाऱ्या या पाचही जणांना आता तुरुंगाची वारी घडवणार आहे. पोलिसांनी आरोपींना अघोरी पूजा करताना रंगेहात पकडले आहे. तसेच अघोरी पूजेच्या साहित्यासह आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुप्तधन मिळविण्यासाठी भानामती करत असल्याची कबुली दिली. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावंगी देवळी गावात हनुमान मंदिराच्या परिसरात हा प्रकार घडला.
हनुमान मंदिराच्या जमिनीत गुप्तधन ?
नागपुरातील हिंगणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावंगी देवळी गावात असलेल्या हनुमान मंदिराच्या जमिनीत गुप्तधन असल्याची अफवा होती. त्यामुळे परिश्रम न करता कमी वेळात श्रीमंत होण्याचा मोह पाच जणांना झाला. परंतु हा मोह त्यांना चांगलाच महागात पडलाय. गुप्तधनाची लालसा त्यांना आता तुरुंगाची वारी घडविणार आहे.
असे केले नियोजन
कमी वेळात जास्त पैसा मिळवून चैनीची जिंदगी जगण्यासाठी जवळच्या पाच आरोपींनी प्लॅन बनविला. त्यानुसार रविवारी रात्री पाच आरोपींनी पायाळू महिलेला सोबत घेत भानामती साठीचे साहित्य सोबत घेत हनुमान मंदिर परिसर गाठला. मंदिर परिसरात त्यांनी खोदकामाला सुरुवात केली.
या घटनेची माहिती गावातील काही लोकांना मिळली. त्यांनी आरोपी शंकर सावरकर (६७, खापाणी मोरेश्वर), विठ्ठल सोमणकर (५२, सावली), बाबा टेंभुरकर (५७, टाकळघाट), वंदना गडकर (४०, सावली), संदीप सहारे (४५, टाकळघाट, सर्व रा.) यांना अघोरी पूजा करताना पकडले.
आरोपी ताब्यात
पोलिसांनी घटनस्थळी पोहोचून अघोरी पूजेच्या साहित्यासह आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी गुप्तधन मिळविण्यासाठी भानामती करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी हर्षल सोनावणे यांच्या तक्रारीवरून सर्व आरोपी विरोधात महाराष्ट्र नरबळी व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नागपूर जिल्ह्यातून ही घटना समोर आल्याने संपूर्ण शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. अंधश्रद्धेला आजही बळी पडणाऱ्यांची संख्या दिसून येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
राज्यात आहे हा कायदा
मूळ विधेयकाचे नामकरण अंधश्रध्दाऐवजी जादूटोणा विरोधी असे करण्यात आले. दिनांक १३ डिसेंबर २०१३ ला विधानसभेत तर दिनांक १८ डिसेंबर २०१३ ला विधान परिषदेत हा अध्यादेश पास होऊन आता तो कायदा म्हणून अस्तित्वात आला. अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे भारतातले पहिले राज्य ठरले.