वाशिम | 29 सप्टेंबर 2023 : तुम्ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी पाहिली असेल. सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीचं शेवटी काय झालं हेही तुम्हाला माहीत असेल. पण सोनं देणारी म्हैस कधी पाहिलीय का? आतापर्यंत तुम्ही म्हैस भरपूर दूध देते एवढंच ऐकलं असेल. पण म्हैस आणि सोनं? वाटलं ना आश्चर्य ! पण तुम्ही वाचताय ते खरं आहे. एका म्हशीच्या पोटातून चक्क सोनं काढलंय. एक दोन नव्हे अडीच तोळं सोनं निघालंय. तेही महाराष्ट्रातील वाशिममध्ये. म्हशीच्या पोटातून सोनं निघाल्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात पसरली. जिल्ह्याच्या बाहेरही गेली. त्यामुळे म्हशीला पाहण्यासाठी लोक दूरून दूरून येत आहेत. त्यामुळे या म्हशीची खास बडदास्तही ठेवली जात आहे. तुम्ही म्हणाल नेमकं झालं तरी काय? म्हशीच्या पोटातून सोनं बाहेर येतंच कसं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची असेल तर आधी ही बातमी वाचाच.
वाशिमच्या सारसी गावात ही घटना घडली. त्यामुळे सारसी गावाला मीडियामध्ये विशेष स्थान मिळालं आहे. सारसी गावातील रामहरी भोयर यांच्या घरी हा प्रकार घडला. रामहरी भोयर हे शेती करतात. त्यांच्याकडे बरीच गुरे ढोरे आहेत. सध्या त्यांच्या शेतात सोयाबीन लावण्यात आलेला आहे. संध्याकाळी शेतातून घरी येताना ते सोयाबीनला आलेल्या लाल शेंगा घरी घेऊन आले. भोयर यांनी भरपूर शेंगा आणल्या होत्या. संध्याकाळी या शेंगांवर ताव मारण्याचा त्यांचा बेत होता.
त्यांनी शेंगा आणून घरातील महिलांच्या हवाली केल्या. या महिलांनी सोयाबीन शेंगा तात्काळ सोलायला घेतल्या. टरफले ताटात काढून टाकली. त्यानंतर रात्री झोपताना उशा शेजारीच असलेल्या या ताटात गीताबाई भोयर यांनी गळ्यातील सोन्याची पोतही काढून ठेवली. ही पोत अंदाजे अडीच तोळ्याची होती. त्यानंतर सकाळी हेच ताट म्हशीसमोर ठेवण्यात आलं. म्हशीला हिरव्या शेंगाची टरफलं खायला मिळावी म्हणून हे ताट ठेवलं. म्हशीनेही या शेंगाच्या टरफलांवर ताव मारला. या शेंगा खाता खाता सोन्याची पोतही गिळून टाकली.
इकडे गीताबाई झोपेतून उठल्या. त्यांनी गळ्याला चाचपून पाहिलं तर गळ्यात पोत नव्हती. त्यामुळे त्या चपापल्या. उशाला पोत ठेवली असेल म्हणून त्यांनी उशी आणि गोधडी झटकली. पण पोत काही सापडली नाही. त्यामुळे गीताबाई चांगल्याच हादरून गेल्या. घरात चोरी तर झाली नाही ना? अशी शंका त्यांना आली. त्यामुळे त्यांनी पती रामहरी भोयर यांना सांगितला.
त्यांनीही घरात शोधाशोध सुरू केली. घरातील प्रत्येक माणूस हा पोत शोधण्याच्या मोहिमेला लागला. घराचा कोपरा न् कोपरा शोधला. पोत काही केल्या सापडेना. नंतर गीताबाईला अचानक आपण पोत ताटात ठेवल्याचं आठवलं. त्यामुळे ताटाचा शोध घेतला. ताट तर म्हशीच्या समोर होतं. पण ताटात काहीच नव्हतं. त्यामुळे पोत म्हशीने तर गिळली नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडला.
रामहरी भोयर यांनी तात्काळ गुरांचा दवाखाना गाठला. झाला प्रकार डॉक्टरांना सांगितला. डॉक्टरांनीही तात्काळ मेटल डिटेक्टरने म्हशीची तपासणी केली. तेव्हा म्हशीच्या पोटात काही तरी असल्याचं जाणवलं. त्यानंतर एक दिवस वाट पाहण्यात आली. म्हशीच्या शेणासोबत पोतही बाहेर येईल असा अंदाज बांधला गेला. पण म्हशीच्या पोटातून पोत काही आली नाही.
अखेर दुसऱ्या दिवशी म्हशीची सोनोग्राफी केली अन् म्हशीच्या पोटात पोत दिसली. अडीच लाखाची पोत म्हशीच्या पोटात पाहून रामहरी भोयर आणि त्यांची पत्नी गीताबाई यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. डॉक्टरांनीही या म्हशीचं ऑपरेशन केलं आणि तिच्या पोटातून पोत काढली. दरम्यान, ही म्हैस व्यवस्थित असल्याचं सांगितलं गेलं. अडीच तोळ्याची सोन्याची पोत हरवली म्हणून तोंडचं पाणी पळालेले रामहरी आणि त्यांच्या पत्नी गीताबाई आता पोत हरवली ते सापडल्याचा किस्सा येईल त्याला हसून हसून सांगत आहेत.