अमरदीप वाघमारे, विवेक गावंडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरू केली आहे. भाजप आणि शिंदे गट एकत्र मिळून ही निवडणूक लढणार आहे. त्यात शिंदे गटाला किती जागा मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान करून शिंदे गटाची झोप उडवून दिली आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप 240 जागा लढणार असल्याचं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. त्यामुळे शिंदे गटाला फक्त 48 जागा मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिंदे गटाकडे 50 आमदारांचं बळ असतानाही त्यांची केवळ 48 जागांवर बोळवण केली जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
भाजपच्या प्रसिद्धी प्रमुखांची काल बैठक पार पडली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रसिद्धी प्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युलाच जाहीर केला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत आपल्या 170 जागा निवडून येतील. पण आपण 240 जागांवर लढणार आहोत. शिंदे गटाचे 50च्यावर आमदार नाहीत. आपण विधानसभा निवडणुकीत 235-240 जागा लढल्या तर तुम्हाला तुमची टीम प्रचंड अलर्ट ठेवावी लागेल. कारण तुम्हाला खूप काम असणार आहे. डिसेंबरनंतरचे पुढचे सहा महिने तुम्हाला रात्र रात्र जागून काम करावे लागेल. त्याची मानसिक तयारी आतापासूनच करा, असं आवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं.
निवडणुकीत विजयी होण्यासाठी आपल्याला सर्वांनाच मेहनत करावी लागणार आहे. तुम्हाला आता रोज जिल्हाभर प्रवास करावा लागणार आहे. जिल्ह्यात जाऊन कामाचा आढावा घ्यावा लागणार आहे. मतदारांशी बोलावे लागणार आहे. युट्यूबवरून संवाद साधा. प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया आणि चॅनेलवरून बोला. लोकांशी संवाद साधा. त्यांना आपली भूमिका पटवून द्या. आपण केलेली विकासाची कामे, प्रगतीपथावर असलेली कामे समजावून सांगा, असं आवाहन त्यांनी केलं.
प्रसिद्धी प्रमुखांच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं. त्यात त्यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला. पण या फॉर्म्युल्यात शिंदे गटाच्या वाट्याला कमी जागा येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय शिंदे गट आणि भाजपची जागा वाटपावर कोणतीही चर्चा झालेली नसताना बावनकुळे यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावरून शिंदे गटाकडून नाराजी ओढवण्याची शक्यता असल्याने अखेर भाजपने सोशल मीडियावरून हा व्हिडीओ हटवला आहे.
दरम्यान, सरकारने 2023-24 अर्थसंकल्प मांडलाया. 13 कोटी जनतेला लाभ देणारा आहे. हा अर्थसंकल्प मांडला तो विरोधकांना त्यांचं मनोबल खच्चीकरण करणारा होता. या अर्थसंकल्पामुळे तोंडही दाखवता येणार नाही ही धास्ती विरोधकांच्या मनात आहे. त्यांचे कार्यकर्ते, नेते एक तर शिंदे गट किंवा भाजपकडे येत आहेत. त्यांचे आमदार नाऊमेद झाले आहेत. कारण अर्थसंकल्प जोरात आला. पुढेही असाच अर्थसंकल्प आला तर आपले आमदार निघून जातील. त्यामुळे घाबरलेल्या स्थितीत महाविकास आघाडी आहे. त्यामुळे कार्यकर्ते जाऊ नये म्हणून नाना पटोले बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
एकनाथ शिंदे सोडून सर्वजण पुन्हा शिवसेनेत येतील असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊतांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा. त्यावर किती उत्तर द्यायचं. त्यांच्याकडे राहिलेले आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे येतील. राहिलेले महाविकास आघाडीचे आमदार भाजपकडे येतील. थोडावेळ बघा. मागे काय झालं हे पाहा. तुम्हाला महाराष्ट्रात पक्षप्रवेशाचे भूकंप दिसतील, असा दावा त्यांनी केला.