नागपूर: भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा गळ्यात हार घालून अभिनंदन केलं. फडणवीसांनी आपल्या गळ्यात विजयाची माळ घातल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे भावूक झाले. त्यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली. बराचवेळ त्यांनी फडणवीसांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. बावनकुळेंना अश्रू अनावर झाल्याचं पाहून फडणवीस यांनाही काही क्षण गहीवरून आलं होतं.
चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी झाल्याचं घोषित करण्यात आल्यानंतर भाजपने त्यांची विजयी मिरवणूक काढली. ही मिरवणूक सुरू होण्यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बावनकुळेंची भेट घेतली आणि त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी फडणवीस यांनी आपल्या गळ्यातील विजयाचा हार फडणवीसांच्या गळ्यात घातला. फडणवीसांनी हा हार काढून तो बावनकुळे यांच्या गळ्यात घालून त्यांचं अभिनंदन केलं. फडणवीसांनी गळ्यात हार घालताच बावनकुळे यांना गहिवरून आलं. त्यांनी लगेचचं फडणवीसांना कडकडून मिठी मारली. बराच वेळ त्यांनी फडणवीसांना मिठी मारली होती. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. बावनकुळेंच्या डोळ्यातील अश्रू पाहून फडणवीसही अस्वस्थ झाले होते. हे चित्रं पाहून भाजपचे कार्यकर्तेही काही काळ स्तब्ध झाले होते. त्यानंतर फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला आणि बावनकुळे यांचं प्रचंड कौतुक केलं.
मी विधानसभा निवडणुकीत विजयी झालो होतो. पण त्या विजयापेक्षा मला आजचा हा विजय सर्वात महत्त्वाचा वाटतो. या विजयाने मला सर्वाधिक आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली. बावनकुळे हे दोन वर्ष संसदीय राजकारणात नव्हते. पण ही पार्टीत गॅप नव्हती. ही लेजिस्लेटिव्ह गॅप होती. बावनकुळेंकडे महासचिवपद हे महत्त्वाचं पद होतं. त्याचा हा कमबॅक म्हणजे नेव्हर गो बॅकवाला कम बॅक आहे. बावनकुळेंच्या विजयाने विदर्भातील मोरल वाढलं आहे. आम्ही दोन्ही जागा जिंकलो. त्याचा फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.
नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक मतमोजणीत 549 मते वैध ठरली. विजयी उमेदवारासाठी 275 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, रवींद्र भोयर यांना 1, मंगेश देशमुख यांना 186 मते प्राप्त झाली. या निवडणुकीत बावनकुळे यांनी 176 मतांनी विजय मिळवत काँग्रेसचा पुरता धुव्वा उडवला.
संबंधित बातम्या: