‘अजित पवार यांच्यावर राजकारणातून सन्यास घ्यायची वेळ येईल’, चंद्रशेखर बावनकुळे असं नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 29, 2022 | 6:31 PM

महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलंय. दोन्ही नेते एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष आणखी वाढताना दिसण्याची शक्यता आहे.

अजित पवार यांच्यावर राजकारणातून सन्यास घ्यायची वेळ येईल, चंद्रशेखर बावनकुळे असं नेमकं काय म्हणाले?
Follow us on

नागपूर : महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांमध्ये सध्या वाकयुद्ध रंगलंय. हे वाकयुद्ध आगामी 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवरुन रंगलंय. हे दोन्ही नेते एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष आणखी वाढताना दिसण्याची शक्यता आहे. हे दोन नेते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे. अजित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची आज खिल्ली उडवली. त्यानंतर बावनकुळे यांनी अजित पवार यांना राजकारणातून सन्यास घ्यायचे दिवस येतीलच, असं विधान केलंय.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीत घड्याळचा करेक्ट कार्यक्रम करायचाय, असं विधान केलं होतं. त्यांच्या याच विधानाला अजित पवार यांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिलं होतं. मी कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवलं तर सोडत नाही. हे सर्वांना माहितीय, असा इशारा अजित पवार यांनी दिला होता.

या दरम्यान अजित पवारांना आज पत्रकारांनी बावनकुळे यांच्या करेक्ट कार्यक्रम बद्दलच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला असता तेव्हा त्यांनी त्या विधानाची खिल्ली उडवली.

हे सुद्धा वाचा

“अरे बापरे! मला तेव्हापासून झोप येईना. हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप उडालीय. एवढ्या मोठ्या ताकदीचा बावनकुळेंसारखा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावं. राजकारणातून सन्यास घ्यावा. 2024 ला पराभवाचा अपमान होण्यापेक्षा सन्यास घेतलेलाच बरा”, असा टोला अजित पवारांनी बावनकुळेंना लगावला.

अजित पवार यांच्या या टीकेनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील प्रत्युत्तर दिलंय. “अजित पवार यांनी आम्हाला चॅलेंजच दिलाय. त्यांनी म्हटलंय की, करेक्ट कार्यक्रम करायचा. तर आम्ही वाट बघतोय. बारामती शहराच्या नावाने 10 हजार कोटी रुपयांच्यावर पैशांचा दुरुपयोग झाला”, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

“अनेक गोष्टी आम्हाला सांगायच्या आहेत. पण वेळ आली की सांगू. पण त्यांना नक्कीच राजकारणातून सन्यास घ्यायचे दिवस येतीलच”, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.