नागपूर | 11 फेब्रुवारी 2024 : “मी आरोपाला आरोपांनी उत्तर देणार नाही. माझ्यावर उठसूठ आरोप करत आहेत. ही दाढी हलकी समजू नका. दाढीची काही काडी फिरवली की तुमची लंका जाळून टाकेल. माझ्या नादाला लागू नका. मला आडवा आला की मी त्याला सोडत नाही”, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “काही लोक आज रामाच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करतात. आम्ही एकदा अयोध्येला जात होतो. आमच्या बॅगा काढायला लावल्या होत्या. तेव्हा झालं काय? जो राम का नहीं वो किसी काम का नहीं. असंगाशी तुम्ही संग केलेला होता, तेव्हाच तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडला. माझा पक्ष चोरला, माझा बाप चोरला, असं दररोज सुरू आहे. एखाद लहान मुलगा असतो तशी कृती सध्या सुरू आहे. बाळासाहेब चोरायला काय एखादी वस्तू आहेत का?”, असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला.
“बऱ्याचं दिवसांपासून रामटेकला येणार, आपलं दर्शन घेणार हे चाललं होतं. अखेर आज रामाचं दर्शन घेण्याचा योग आला. रामटेक ही एक ऐतहासिक भूमी आहे. अनेक शतकांच्या वनवास पार करून राम विराजमान झाले. लाखो करोडो राम भक्ताचं स्वप्न पूर्ण झालं. अयोध्येत राम मंदीर व्हावं असं स्वप्न होतं. संपूर्ण जल्लोषाचं वातावरण तयार झालं. दररोज लाखो लोक त्यांचं दर्शन घेतात. अयोध्येचं दर्शन करण्यापूर्वी रामटेकला हिंदुत्वाचा भगवा झेंडा खांद्यावर घेवून आलेलो आहे. सहाशे वर्षापासून रामाचं मंदीर येथे असल्याचं पाहिला मिळतं. शिवसंकल्प अभियान आपण घेवून पुढे जातोय. शिवछत्रपती शिवरायांच्या भूमीत शिवसंकल्प अभियान सुरू झालंय”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“राष्ट्रपती राजवट अशीचं लागते का? कधी निवडणुका घ्या, कधी हे करा, असा थयथयाट सुरू आहे. कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालणारं हे सरकार नाही. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांवर तुम्ही देशद्रोह्याचा गुन्हा दाखल केला. अशा किती घटना झाल्याचं पाहिला मिळालं. आपल्या मित्रपक्षांशी बेईमानी केली होती. खरी बेईमानी आपण 2019 ला केली. धनुष्यबाण आपण वाचवण्याचं काम केलं. जिकडे आपण जातोय तिकडे जनता साथ देतेय”, असा दावा एकनाथ शिंदेंनी केला.
“महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांनी आपल्याला साथ दिली असती का? एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे बघवलं नाही. ही इंडीया आघाडी बिघाडी झालेली आहे. या देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रामध्ये अब की बार 45 पार अशी भूमिका घ्यायची आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“पाऊस पडत आहे. हा पाऊस देखील सभेला आशीर्वाद द्यायला आलेला आहे. आपल्या सरकारनं केलेलं काम आपल्यासमोर आहे. काँग्रेस सरकारनं केलेले घोटाळे तुमच्यासमोर आहेत. नरेंद्र मोदींनी केलेलं काम तुमच्यासमोर आहे. दहा वर्षात मोदींना डाग लावण्याची हिंमत कुणी केली नाही. आपल्याला लोकापर्यंत काम करायचं आहे”, असं शिंदे म्हणाले.