गजानन उमाटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 27 डिसेंबर 2023 : काँग्रेसच्या 138व्या स्थापना दिनानिमित्ताने उद्या नागपुरात महारॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. 40 एकर जागेवर ही महारॅली होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण नागपूर आणि विदर्भ नगरी सजली आहे. जागोजागी पोस्टर्स, बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या महारॅलीला प्रचंड गर्दी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या रॅलीसाठी नागपुरात येणार आहेत. त्यामुळे या रॅलीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
नागपुरात उद्या होणाऱ्या या महारॅलीच्या सभा स्थळाला ‘भारत जोडो मैदान’ असे नाव देण्यात आलं आहे. 40 एकर मैदानावर ही सभा होत आहे. सभेच्या ठिकाणी तीन भव्य स्टेज उभारण्यात आले आहेत. या स्टेजवर देशभरातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, आमदार, खासदार, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री बसणार आहेत. सभेसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी नागपूरात येणार आहेत.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिघोरी मैदानावर जाऊन सभेचा आढावा घेतला. तसेच संबंधितांना काही सूचनाही केल्या आहेत. ही सभा जंगी करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. या सभेच्या माध्यमातून काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकलं जाणार आहे. त्यामुळे काँग्रेस नेते उद्याच्या रॅलीत काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या सभेच्या निमित्ताने काँग्रेसने है तय्यार हम… असा नवा नारा दिला आहे. “है तय्यार हम, महिला अपराध के खिलाफ” अशा घोषणा लिहिलेले बॅनर्स आणि होर्डिंग्ज नागपूरमध्ये झळकले आहेत. त्यामुळे नागपूरमधील वातावरण काँग्रेसमय झालं आहे. है तय्यार हमचा ई रिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला आजात आहे. विशेष, म्हणजे घोटाळ्याप्रकरणी शिक्षा झालेले आणि आमदारकी गमवावी लागलेले काँग्रेस नेते सुरेश केदार यांचे फोटोही काँग्रेसच्या बॅनर्सवर झळकले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.