नागपूर : अमरावती रोडवरील सुराबर्डी तलाव नागरिकांची पिण्याच्या पाण्याची तहान भागवितो. परंतु, काही लोकांच्या जनावरांच्या गोठ्यातील मलमूत्र तसेच स्मशानातील राखयुक्त पाणी याच तलावात सोडले जाते. याचा विरोध करण्यासाठी शेतकरी नितीन शेंद्रे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
सुराबर्डीतील सांडपाण्याची वाहिनी सुराबर्डीच्या तलावात सोडण्यात आली आहे. यामुळं तलावाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. हा तलाव प्रदूषित होण्यापासून वाचविण्यासाठी उपाययोजना करण्याचे न्यायालयाने आदेश द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नितीन शेंद्रे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं हा आकर्षक तलाव निरुपयोगी होण्याच्या मार्गावर आहे. लावा-सुराबर्डी पाणीपुरवठा योजनेअंतर्गत परिसरातील अनेक गावांना या तलावाचे पाणी पुरविले जाते. शौचालय, मुत्रीघरातील घाणही या तलावात सोडली जात आहे, असंही याचिकेत म्हटलं आहे.
बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठने राज्य सरकार, जलसंपदा विभाग, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावली. यावर चार आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. सुराबर्डी तलावाचा परिसर 75.39 हेक्टर आहे. आजूबाजूच्या गावांतील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज हा तलाव भागवितो. पण, याच तलावात मल-मुत्रयुक्त पाणी मिसळत आहे, असे याचिकेत म्हटले आहे.
सुराबर्डी ग्रामपंचायतीने या तलावाजवळ दोन सिमेंटचे चबुतरे तयार केले. गावातून तलावाकडे जाणार्या 60 मीटर रुंदीच्या पांदण रोडवर अनेकांनी अतिक्रमण करून घरे बांधली आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळं रस्ता फक्त 10 फूट उरला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने नोटीस बजावली. याचिकाकर्त्यातर्फे अँड. सुधीर मालोदे आणि राज्य सरकारतर्फे अँड. केतकी जोशी यांनी बाजू मांडली.